शहरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी राज्य शासनानं विशेष बसची व्यवस्था केली आहे. दरम्यान, मोफत प्रवासाच्या चौकशीसाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकाबाहेर प्रवाशांनी एकच गर्दी केली. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

अडकून पडलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमधील मजूर, कामगार, विद्यार्थी तसेच प्रवाशांसाठी सुरुवातीला ९ मे रोजी राज्य शासनानं मोफत एसटी प्रवासाची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १० मे रोजी आपला हा आदेश फिरवत मोफत एसटीची सेवा फक्त मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी असल्याचा आदेस शासनानं काढला. मात्र, या आदेशाची माहिती अद्याप लोकांपर्यंत पोहोचली नसल्यानं त्याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्यात विविध भागात अडकलेले तसेच परराज्यात अडकलेले लोक ज्यांना संबंधित राज्यातील लोकांनी आपल्या सीमेपर्यंत सोडलं आहे. अशा लोकांनाच सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसेस (एसटी) सुरु करण्यात आल्या आहेत. अद्यापही लॉकडाउन सुरु असल्यानं अद्याप नियमित राज्यांतर्गत प्रवास सुरु झालेला नाही. या बाबींची स्पष्टता नसल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर राज्यातील विविध बस डेपोंमध्ये चौकशीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला येथील नेहरुनगर, ठाण्यातील खोपट, पनवेल तसेच कोल्हापूर आणि रत्नागिरी विभागातील एसटी डेपोंमध्ये लोकांनी सोमवारी मोफत एसटी प्रवासाच्या चौकशीसाठी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी एसटी महामंडळाला अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.