राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मुंबई महापालिका निवडणुकीची रंगू लागली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर भाजपानंही तयारी सुरू केली आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळाल्यानं भाजपाला हुरूप आला आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याचंही बोललं जात आहे. भाजपा-मनसे युतीबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजपाबरोबरच काँग्रेसनंही तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार असल्याचं सांगितलं जातं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेते त्याविषयी भाष्य करत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्याविषयी दोन्ही पक्षांकडून काही वाच्यता केली जात नसली, तरी राजकीय वर्तुळात मात्र, जोरदार चर्चा रंगत आहेत.

भाजपा-मनसे युतीबद्दल मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपाला टोला लगावला. अध्यक्षपदाची सूत्रं हाती आल्यानंतर भाई जगताप यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर जेजुरीहून मुंबईकडे जात असताना त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भाई जगताप म्हणाले,”मेट्रोकार शेडचा मुद्दा राजकीय बनवला आहे. भाजपाने त्यावरुन राजकारण करण्याची गरज नाही. मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू हा मुद्दा महापालिका निवडणुकीत राहणार नाही. तसेच भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कथित युतीत भाजपाने एकदा ‘लाव रे तो व्हिडिओ स्वतःच बघावेत,” असा टोला जगताप यांनी लगावला.