दिवसभर झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला शिवसेना आणि भाजप जबाबदार असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. मुंबईकरांना झालेल्या त्रासाला सर्वस्वी शिवसेना-भाजप सरकार आणि महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. शिवसेना-भाजपने महापालिकेतील सत्ता सोडावी आणि महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘मुंबईतील रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. हिंदमाता परिसरात ४ ते ५ फूट पाणी तुंबले आहे. केइएम रुग्णालयात पाणी भरले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप हे सत्ताधारी आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच मुंबई तुंबली आहे,’ अशा शब्दांमध्ये निरुपम यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

पालिकेकडून पावसासाठी करण्यात आलेल्या तयारीवर आणि त्या तयारीच्या उडालेल्या बोजवाऱ्यावरदेखील संजय निरुपम यांनी कठोर शब्दात टीका केली. ‘पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने ६ पंम्पिंग स्टेशन्स निर्माण केले आहेत.त्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. ते नादुरुस्त स्वरुपात आहेत. महापालिकेतील शिवसेना-भाजप सरकारने ते पैसेसुद्धा खाल्ले,’ असा आरोपदेखील निरुपम यांनी केला. ‘महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये ड्रेनेज सिस्टिमसाठी खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये इतकी रक्कम नालेसफाईवर खर्च केली जाते. मात्र तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. ही महापालिकेने शिस्तबद्ध पद्धतीने केलेली लूट आहे’, अशा शब्दांमध्ये त्यांनी पालिकेच्या कारभारावर शरसंधान साधले.

‘मुंबईतील पंम्पिंग स्टेशन्सची क्षमता वाढवलेलीच नाही. हिंदमाताजवळ पाणी साचणे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खोदकाम करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम उपनगरामधील लोकांचेही फार हाल झालेले आहेत. त्यातच भरीस भर म्हणून मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग परिस्थिती आटोक्यात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे,’ असे निरुपम यांनी म्हटले.

पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केले असते, तर आज मुंबई तुंबली नसती, अशी टीकाही निरुपम यांनी केली. ‘या सरकारने फक्त भ्रष्टाचार केला. त्यामुळेच आज सर्व मुंबईकर अडचणीत सापडले आहेत. मुंबईकर नियमित प्रामाणिकपणे कर भरतात. परंतु हे सरकार त्यांना सामान्य सुखसोईसुद्धा देऊ शकत नाही. शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिका चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेची सत्ता सोडावी,’ असेदेखील ते पुढे बोलताना म्हणाले.