काँग्रेसचा शिवसेनेवर निशाणा
पालिकेच्या घोटाळ्यास वांद्रय़ाचा साहेब, त्याचा मेव्हणा आणि सचिव जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. तोच धागा पकडून ‘वांद्रय़ाचा साहेब कोण’ अशी विचारणा करत काँग्रेसच्या सदस्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत गोंधळ घातला. या गोंधळातही स्थायी समिती अध्यक्षांनी १७ प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने पुढे बैठक तहकूब करण्यात आली.
विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीचे कामकाज सुरू होताच हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संतापलेल्या प्रवीण छेडा यांनी कागदी फलक झळकावत किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याचे शिवसेनेने स्पष्टीकरण द्यावे, ‘वांद्रय़ाचा साहेब, त्याचा मेव्हणा, सचिव’ म्हणजे नक्की कोण त्याची माहिती द्यावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेत्यांनी ‘मातोश्री’कडे अंगुलिनिर्देश करताच शिवसेनेचे नगरसेवक खवळले. या बैठकीस काँग्रेसचे काही नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र प्रवीण छेडा यांनी एकाकी खिंड लढवून शिवसेनेच्या नगरसेवकांना जेरीस आणले. पालिकेत माफिया राज कोण चालवतो, पालिकेतला भ्रष्टाचार थांबवा अन्यथा पावसाच्या पाण्यात शिवसेना बुडेल, अशा घोषणा देत प्रवीण छेडा यांनी बैठकीत गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेत यशोधर फणसे यांनी १७ प्रस्तावांना मंजुरी दिली. प्रस्ताव संपल्यानंतर यशोधर फणसे यांनी स्वपक्षाच्या नगरसेवकांना हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याची संधी दिली. मात्र गोंधळामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना हरकतीचे मुद्दे उपस्थित करणे अशक्य झाले. अखेर यशोधर फणसे यांनी कामकाज संपल्याचे जाहीर केले.