मुंबई : डिसेंबर महिन्यातदेखील अनुभवलेले पावसाळी हवामान, मध्येच वाढणारे तापमान या सर्वातून वर्षअखेरीस मुंबईकरांना थंडीचा अनुभव मिळाला. मंगळवारी सकाळी मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी पारा १५ अंशापर्यंत उतरला. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान १६.४ अंश नोंदविण्यात आले, तर बोरिवलीमध्ये पारा १५ अंशापेक्षाही खाली गेला. कमाल तापमानातदेखील सोमवारपेक्षा दोन अंशांनी घट होऊन मंगळवारी दिवसातील तापमान २८.८ अंश नोंदविण्यात आले. शहरात सायंकाळी काही ठिकाणी थंड वारेदेखील होते.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे आणि राज्यातील कोरडय़ा हवेमुळे तापमानात घट होत आहे. मुंबईबरोबरच मध्य महाराष्ट्रातदेखील पारा उतरला असून महाबळेश्वर येथे किमान तापमान ११ अंश, नाशिक आणि सातारा येथे १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. राज्यभरात कमाल तापमानात फारसा बदल जाणवला नाही. गेल्या आठवडय़ापासून अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला होता. मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षाच होती, ती वर्षअखेरीस संपली.