News Flash

मुंबई: विनाकारण प्रवास करणाऱ्यांना दणका, एकाच दिवसात १६ हजार वाहने जप्त

दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका

फोटो सौजन्य - निर्मल हरींद्रन

मुंबईत सोमवारी सकाळी विविध भागांमध्ये मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोगलगायीच्या गतीने वाहने पुढे सरकत होती. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासणी नाक्यांमुळे काल मुंबईत ही वाहतूक कोंडी झाली.

या तपासणी दरम्यान पोलिसांनी एकाचदिवसात तब्बल १६ हजार वाहने जप्त केली. या वाहन चालकांना आपण का बाहेर निघालोय? प्रवासाचे कुठलेही ठोस कारण पटवून देता आले नाही. त्यामुळे या १६ हजार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. रविवारच्या तुलनेत सोमवारी दुप्पट वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नव्या निर्देशानुसार, ऑफिस आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरापासून दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर विनाकारण प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी पोलिसांनी कोणालाही सोडले नाही. कोणी रक्त चाचणीसाठी, किराणा सामान आणण्यासाठी किंवा बीपीओमध्ये कामावर जाण्यासाठी निघाले असले, तरी त्यांची वाहन तपासणी केली. जवळपास ३८ हजार गाडयांची तपासणी करण्यात आली.

दहीसर आणि मुलुंड चेकनाका या मुंबईच्या प्रवेशाच्या आणि एक्झिट पॉईंटवर सकाळी ९.३० च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना थोडेस अंतर कापण्यासाठी सुद्धा अर्धा ते एक तास थांबून रहावे लागत होते. पोलिसांच्या या तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार सोपे लक्ष्य ठरले. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गाडयांपैकी ७२ टक्के दुचाकी आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 11:44 am

Web Title: mumbai cops impound 16000 vehicles dmp 82
Next Stories
1 ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी, पाकिस्तानमधील कराचीमधून फोन
2 २०० ठिकाणी नाकाबंदी
3 मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांना १ हजार रुपये दंड
Just Now!
X