मुंबई पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्हॉट्स अॅपद्वारे एका महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला थेट जम्मू-काश्मीरच्या भारत-पाकिस्तान सीमेजवळून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मेहफूज मोहम्मद राशिद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी आणि जवळपास 20 ते 25 नातलगांनी अटकेला विरोध केला असतानाही त्यांच्या विरोधाला न जुमानता मुंबईच्या वडाळा पोलिसांनी आरोपीला यशस्वीपणे अटक केली आणि मुंबईत आणलं.

‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, वडाळा येथील एका महिलेला 2 जानेवारी रोजी सर्वप्रथम एका अनोळखी क्रमांकावरुन अश्लील व्हॉट्स अॅप मेसेज आला. त्यानंतर एकामागोमाग एक अश्लील व्हिडिओ त्या क्रमांकावरुन आले. महिलेने याबाबत पतीकडे तक्रार केली. तिच्या पतीने त्या क्रमांकावर फोन करुन जाब विचारला असता त्याने उद्धटपणे, ‘मला व्हिडिओ पाठवायचे होते म्हणून मी पाठवले, जे करायचं ते करा’ असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर विवाहितेच्या पतीने पाच जानेवारी रोजी याबाबत वडाळा पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यावर पोलिसांनी भादंवी 354(अ)1 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरू केला. पण आरोपीने त्याचा फोन आणि सीमकार्ड दोन्ही बदलल्यामुळे पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली होती. अखेर 17 मे रोजी तो जम्मू-काश्मीर्चाय पुंछ सेक्टरमधील बाफ्लियाज गावात असल्याचं पोलिसांनी ट्रेस केलं.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चारु भारती आणि अजित कदम व संदिप नाईक हे दोन पोलीस शिपाई अशा तीन जणांचं पथक आरोपीला अटक करण्यासाठी काश्मीरला पाठवण्यात आलं. तेथे पोहोचल्यावर पथकाने पुंछमधील पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. पुंछ सेक्टर सीमेजवळ असल्यामुळे संवेदनशील परिसर आहे, त्यामुळे 18 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून पोलिसांचं पथक आरोपीच्या घराबाहेर दबा धरुन बसलं होतं. 19 मे रोजी सकाळी आरोपी त्याच्या घराजवळ दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

आरोपीला राजौरी पोलीस स्थानकात आणेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीचे कुटुंबीय आणि जवळपास 20-25 नातलगांचा जमाव गोळा झाला होता. त्यांनी आरोपीच्या अटकेला विरोध केला, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता मुबई पोलीस आरोपी खानला घेऊन मुंबईत दाखल झाले. आरोपी खानला न्यायालयात हजर केलं असता त्याला 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.