जोधपूर येथे अटक; आईच्या हत्येचा पश्चात्ताप नाही

‘होय, मीच आईची हत्या केली. मला या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप होत नाही. ती आत्मकेंद्रीत होती. मला नेहमी अभ्यासावरून ओरडायची. मी व बाबा तिच्याविरोधात कट करतोय असा तिला कायम संशय असायचा. या तिच्या संशयी वृत्तीचा मला कंटाळा आला होता..’, असे सांगताना सिद्धांत गणोरेच्या चेहऱ्यावर कुठेही पश्चात्तापाची पुसटशी रेषा नव्हती. खार पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली (४२) यांची हत्या करून फरार झालेल्या सिद्धांतला (२१) जोधपूर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर सिद्धांतने आईच्या हत्येची कबुली दिली.

सांताक्रूझ येथे राहत्या घरात आई दीपाली गणोरे हिची हत्या करून सिद्धांत मंगळवारपासून फरार होता. दीपाली यांच्या मृतदेहाजवळच त्याने ‘मला पकडा आणि फाशी द्या’, असा संदेश लिहून ठेवला होता. दोन लाख रुपये घेऊन पसार झालेल्या सिद्धांतच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्याच्या एका मित्राकडून तो जयपूरला रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तोच धागा पकडून पोलिसांचे एक पथक जयपूरला रवाना झाले. मात्र, तेथेही गुंगारा देत सिद्धांत जोधपूरला पोहोचला. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जोधपूर पोलिसांना सतर्क केले. सिद्धांतचे छायाचित्र व अन्य तपशील पाठविण्यात आला. त्यावरून गुरुवारी सिद्धांतला जोधपूर रेल्वे स्थानकाजवळील ‘धूम’ या हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. सिद्धांतला आज, शुक्रवारी मुंबईला आणण्यात येणार आहे. दरम्यान, सिद्धांतने जोधपूर पोलिसांकडे आईची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभ्यासात हुशार असलेल्या सिद्धांतला दहावीत ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळाले होते. त्यानंतर दोन वर्षे अभियांत्रिकीचा अभ्यास केल्यानंतर सिद्धांतने अचानक विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणारा सिद्धांत परीक्षांना बसलाच नाही. त्याची विचारणा करणारी नोटीस महाविद्यालयाने गणोरे यांच्या घरी पाठवली होती. मात्र, सिद्धांतने तीही पालकांपासून दडवून ठेवली होती. परंतु त्याचे हे बिंग अलीकडेच फुटले. त्यावरून गणोरे कुटुंबात प्रचंड वादावादी झाली. सिद्धांतचे समाजमाध्यमांवरील अस्तित्व, मित्र परिवार, त्याचे छंद, ‘पॉकेट मनी’ म्हणून मिळणारे पैसे या सगळ्यावर दीपाली यांनी बंधने आणली. सिद्धांतला वडील ज्ञानेश्वर यांचा ओढा जास्त होता. दीपाली यांना ते सहन होत नव्हते. किरकोळ कारणांवरून घरात घडणारे वाद, त्यात ज्ञानेश्वर यांनी चूक नसताना मागितलेली माफी आदी बाबींचा सिद्धांतच्या मनावर खोलवर परिणाम घडल्याचे समजते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तो घराबाहेर न पडता एकांतात कादंबऱ्या, पुस्तकांचे वाचन करत बसे.

दरम्यान, सिद्धांतने जोधपूर कसे गाठले, तो जयपूरलाच गेला ही नेमकी माहिती पोलिसांना कशी मिळाली याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. मिळेल ती गाडी पकडून सिद्धांत सुरत, जयपूर आणि जोधपूर येथे पोहोचल्याचे खासगीत सांगण्यात येते. तर दीपाली यांची हत्या करून सिद्धांतने विमानाने जयपूर गाठल्याचीही चर्चा आहे.