देशात करोना रुग्णसंख्या वाढत असताना सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत करोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं चित्र आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला भयावह परिस्थिती निर्माण झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरूवातीला मुंबईत करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानं रुग्णांची बेडसाठी प्रचंड हेळसांड झाली. मात्र, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महापालिकेनं परिस्थितीवर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले.

मुंबईत बुधवारी १ हजार ९४६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३७ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्के इतकं आहे. आतापर्यंत एकूण ६ लाख २९ हजार ४१० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ३८ हजार ६४९ करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर १८९ दिवसांवर पोहोचला आहे. तर ६ मे ते १२ मे पर्यंत रुग्ण वाढीचा दर हा ०.३६ टक्के इतका आहे. करोनामुळे मागच्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या ७ दिवसातील करोना रुग्णसंख्या

  • १३ मे २०२१- १९४६
  • १२ मे २०२१- २११६
  • ११ मे २०२१- १७१७
  • १० मे २०२१- १७९४
  • ९ मे २०२१- २४०३
  • ८ मे २०२१- २६७८
  • ७ मे २०२१- ३०३९

करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनं लादलेल्या कठोर निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सुप्रीम कोर्ट आणि नीती आयोगानं मुंबई करोना व्यवस्थापनाचं कौतुक केलं आहे. सध्या मुंबई मॉडेलची देशभरात चर्चा आहे.