संदीप आचार्य

मुंबई : गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यानंतरही योग्य खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात आला आहे. आज पालिकेच्या २४ विभागांपैकी २३ विभागात करोना दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर गेला असून आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केले आहे.

मुंबईत करोना चचण्या जास्त करूनही रुग्णसंख्या दोन हजारावरून बारशेपर्यंत कमी झाली आणि काल केवळ ८०४ रुग्ण सापडले आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप मोठे असून बहुतेक रुग्णालयात करोनाचे बेड मोठ्या प्रमाणात रिकामे आहेत. महापालिकेने मास्क न वापरणाऱ्यांवर केलेली कठोर कारवाई तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुंबईतील करोना आटोक्यात येण्यास मोठी मदत झाल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. लालबाग- परळ, नायगाव, शिवडी, काळाचौकी या पालिकेच्या एफ- दक्षिण विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २५६ दिवसांवर गेला असून रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२७ टक्के झाला आहे. संपूर्ण मुंबईत हा सर्वात कमी दर आहे. मुंबईचा करोना संसर्गाचा सरासरी दर १३२ दिवसांवर गेला आहे. गेल्या महिन्यात हाच दर ६८ इतका होता.

मुंबईची करोना परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. अनलॉकिंग व हॉटेल – रेस्तराँ उघडी झाल्यानंतर मुंबई पुन्हा गजबजू लागली आहे. यातून करोना पसरू नये यासाठी लोकांनीही मास्कचा काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे. लोकांनी मास्क व सुरक्षित अंतर याचे भान ठेवावे यासाठी २४ वॉर्डांमध्ये २५०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणाऱ्या किमान हजारो लोकांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे मुंबईचे चित्र बदलल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना आयुक्त चहल यांनी सांगितले. या कारवाईचा आढावा आपण स्वत: रोज सायंकाळी घेत असून मुंबई खुली होत असताना जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. दसऱ्यापासून जिम सुरु झाल्या आहेत मात्र त्यांना सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.

गेले सहा महिने पालिकेचे डॉक्टर अविश्रांतपणे काम करत आहेत. आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे मृत्यूदर गेल्या महिन्याच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी कमी झाला आहे. ११ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्याजोगे म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६,६३२ एवढी होती तिचे ११ ऑक्टोबरला २२,३६९ एवढी कमी झाली आहे. रुग्ण दुपटीने प्रमाणही ५८ दिवसांवरून १०० दिवसांपर्यंत गेले आहे. महत्वाचा भाग म्हणजे गेल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचे जे प्रमाण ७४ टक्के होते ते ऑक्टोबर महिन्यात ८५ टक्के झाले आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही रोज सात हजार चाचण्या करत होतो त्या वाढवून आता रोज १६००० हून अधिक चाचण्या करत असूनही रुग्णसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कामामुळे हजारो मधुमेही व उच्च रक्तदाबाचे रुग्ण नव्याने सापडले. ज्येष्ठ लोकांची वॉर्डनिहाय यादी करता आली. त्यांना सावध करून योग्य काळजी घेत असल्याने करोनाचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली आहे. आता मास्क न घालणाऱ्यांवर लोकांवर व्यापक कारवाई सुरु केली आहे. प्रत्येक वॉर्डात मार्शल नेमण्यात आले असून जागोजागी ते कारवाई करत आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आली असून जवळपास अडीच हजार मार्शल मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत असल्याने लोकही योग्य काळजी घेऊ लागले आहेत. मुंबईची आम्ही सर्वार्थाने काळजी घेत असून मुंबईची करोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सावध आहोत आणि लोकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त चहल यांनी केले.