मुंबई : मुंबईमधील करोना वाढीचा सरासरी दर शनिवारी ०.०३ टक्क्यांनी घसरून १.५७ वर टक्क्यांवर स्थिरावला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ४४ दिवस झाला आहे. त्यामुळे करोना संसर्गाचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. मुंबईत शनिवारी ८,८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी ८,८३४ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या पाच लाख ७० हजार ८३२ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ३५ पुरुष आणि १७ महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १२ हजार २९४ मुंबईकरांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. ६,६१७ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत चार लाख ६९ हजार ९६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी शनिवारी ४७ हजार २५३ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची संख्या ४८ लाख ९९ हजार ००५ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये ८७ हजार ३६९ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्यात ५ हजार २७५ नवे करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ५ हजार २७५ नवे करोना रुग्ण आढळून आले. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याातील रुग्णसंख्येत किंचित घट होताना दिसत आहे. जिल्ह्याात आतापर्यंत ४ लाख ११ हजार ३६८ करोनाबाधित आढळून आले असून असून मृतांची संख्या ६ हजार ९०० झाली आहे. जिल्ह्याात शनिवारी आढळून आलेल्या ५ हजार २७५ करोनाबाधितांपैकी कल्याण डोंबिवली पालिका १ हजार ३९४, ठाणे पालिका क्षेत्रात १ हजार ४७५, नवी मुंबई ९९३, मिरा भाईंदर ४७२, अंबरनाथ २६३, ठाणे ग्रामीण २४७, बदलापूर  २०३, उल्हासनगर १७० आणि भिवंडीत ५८ रुग्ण आढळले. तर ३६ मृतांपैकी मिरा भाईंदर ११, नवी मुंबई नऊ,ठाणे पाच, कल्याण चार, अंबरनाथ तीन, ठाणे ग्रामीण तीन आणि उल्हासनगरमधील एकाचा सामावेश  आहे.

थुंकणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांना आदेश

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय असलेल्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ११७ नुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तालयाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.  पोलीस उपायुक्त (अभियान) चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार थुंकणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील. तसेच त्यांना संरक्षण पुरवले जाईल, प्रोत्साहित केले जाईल.