१,७९४ जणांना करोनाची बाधा, ७४ मृत्यू

मुंबई : मुंबईमधील नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्या सोमवारी दोन हजारांच्या खाली घसरली आहे. सोमवारी १,७९४ जणांना करोनाची बाधा झाली, तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ लागली. आजघडीला मुंबईतील करोना वाढीचा दर ०.४१ टक्क्य़ांवर घसरला आहे. तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९१ टक्क्य़ांवर आणि रुग्ण दुप्पटीचा कालावधी १६३ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली. आतापर्यंत १३ हजार ८९१ मुंबईकरांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ३,५८० रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले आहेत. तर विविध रुग्णालयांमध्ये ४५ हजार ५३४ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी सोमवारी सुमारे २३ हजार ०६१ चाचण्या करण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्य़ात १,४९५ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १,४९५ करोना रुग्ण आढळून आले. तर, ५५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन आठवडय़ातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत ४ लाख ९० हजार २७४ रुग्ण आढळले असून ८ हजार १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात ३८८, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६९, मीरा-भाईंदर २२३, ठाणे ग्रामीण २०२, नवी मुंबई १३२, बदलापूर ५७, अंबरनाथ ५३, उल्हासनगर ४६ आणि भिवंडीत २५ रुग्ण आढळून आले आहेत. तर कल्याण-डोंबिवली १५, मीरा-भाईंदर १२, ठाणे ग्रामीण १०, नवी मुंबई नऊ, ठाणे सात, भिवंडी एक आणि उल्हासनगरमधील एकाचा मृत्यू झाला आहे.