दिवाळीनिमित्त होणारी गर्दी चिंताजनक, ९९८ जणांना संसर्ग

मुंबई : मुंबईतील करोना रुग्ण दुपटीचा काळ सरासरी २४१ दिवसांवर, तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मात्र दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी चिंतेचे कारण ठरू लागली आहे. दरम्यान, मुंबईतील ९९८ जणांना रविवारी करोनाची बाधा झाली असून, २३ रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र रविवारी पुन्हा एकदा नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली.

मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ६४ हजार ५४३ वर पोहोचली आहे. रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १८ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश होता. यापैकी १६ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत १० हजार ४४२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ८६५ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ३६ हजार ५२२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये १६ हजार ८५९ रुग्ण उपचार घेत आहेत.

दिवाळीच्या खरेदीनिमित्त नागरिक बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी करू लागले आहेत. गणेशोत्सवातही अशीच गर्दी उसळली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागली होती. आताही बाजारपेठांमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ६०८ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात रविवारी ६०८ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार १०३ झाली आहे. तर, दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ५ हजार ४५० झाली आहे.  जिल्ह्य़ात रविवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील १५२, ठाणे शहरातील १४२, नवी मुंबईतील ११६, मीरा-भाईंदरमधील ५९, ठाणे ग्रामीणमधील ४१, उल्हासनगर ३२, अंबरनाथ ३१, बदलापूर १९ आणि भिवंडीतील १६ रुग्णांचा समावेश आहे.