News Flash

करोनाचा उद्रेक! मुंबईतील ३०५ इमारती BMCनं केल्या सील

सहा दिवसांत १३ हजार रुग्णांची वाढ

(संग्रहित छायाचित्र)

सहा दिवसांत १३ हजार रुग्ण. डोळे विस्फारून टाकणारी ही आकडेवारी आहे मुंबईतील. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, शनिवारी ३ हजार ६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेनं मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हणजे मागच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील ती रुग्णसंख्या होती २ हजार ८४८ इतकी. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे.

वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहांसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

मुंबईत टाळेबंदी शिथिल झाल्यापासून सर्वत्र नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढला आहे. परिणामी, पालिके ने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी करोना प्रतिबंधासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मॉल आणि मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून नियम-निर्बंध धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिके च्या विभाग कार्यालयांमार्फत चाचण्या केल्या जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 11:13 am

Web Title: mumbai coronavirus update 305 buildings sealed 13k fresh cases in 6 days bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का?
2 त्या रात्री नेमकं काय घडलं?; एनआयएने सचिन वाझेंना अंबानींच्या घराबाहेर कुर्ता घालून चालायला लावलं
3 ‘फास्टॅग नसलेली वाहने बेकायदा म्हणायची का?’
Just Now!
X