मुंबई आणि महाराष्ट्रावरील करोनाचं संकट कायम आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच मुंबईतील प्रसिद्ध रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. करोनाचा संक्रमण दर कमी झाल्यानंतर राज्यात दिवसाला २ ते ३ हजाराच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत होते. मुंबईतील रुग्णांचं प्रमाण घटलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही करोनाचा प्रसार वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. करोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईचा डबलिंग रेट २३८ दिवसांवर

मुंबई महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट आता २३८ दिवसांवर गेला आहे. अर्थात आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी २३८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याचवेळी मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत २४ तासांत ११०३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख २९ हजार ८४३ झाला आहे. त्यासोबतच २४ तासांत मुंबईत करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ११ हजार ४८७ झाला आहे. तर ६५४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.