राज्यातील भागांबरोबरच मुंबईतही करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज १ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून येत असून, आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढलं आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये अशंतः लॉकडाउन वा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, आता मुंबईतही अंशतः लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने अस्लम शेख यांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत करोना संक्रमण नियंत्रणात आलं नाही, तर अंशतः लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो,” असं सूचक विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असलेल्या मुंबईत रविवारी १,३६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर शनिवारी १,१८८ रुग्ण आढळून आले होते. २४ तासांतच मुंबईत दोनपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर संकट उभं राहताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
मुंबईसह राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रविवारी (७ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. मागील आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये राज्यात ५३,५१६ नव्या रुग्णांचे निदान झाले. हाच कल कायम राहिल्यास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रतिदिन १० हजारांपेक्षा अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
बाधितांचे प्रमाण दुप्पट
राज्यात महिन्याभरात बाधितांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दररोज सरासरी ६१ हजार चाचण्या केल्या जात होत्या. बाधितांचे प्रमाणही सरासरी पावणेपाच टक्के होते. मार्चमध्ये चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून पहिल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ८२ हजार चाचण्या केल्या गेल्या. त्यांतून बाधितांचे प्रमाण सरासरी दहा टक्के आढळले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 8, 2021 12:50 pm