मुंबईत दिवसभरात १,२२२ बाधित; ४६ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १२६ दिवसांवर गेला आहे. रविवारी १,२२२ रुग्ण आढळून आले असून, ४६ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण संख्या कमी झालेली असली तरी दैनंदिन मृत्यू संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग ०.५५ टक्के झाला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील २४ विभागांपैकी २१ विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांपेक्षा जास्त आहे. तर परळ, शिवडी विभागात हा कालावधी २२४ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत रविवारी १,२२२ रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या २,५१,२८३ वर पोहोचली आहे. एका दिवसात १०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २,२०,१६५ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १९, ७२१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ११४८ रुग्ण गंभीर आहेत.

रविवारी ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत करोनामुळे १०,०६२ रुग्णांचा बळी गेला आहे. ४६ मृतांपैकी ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश होता. मुंबईमध्ये सध्या दर दिवशी ४५ ते ५०रुग्णांचा मृत्यू होत आहे.

सध्या मुंबईतील ८५०० इमारती प्रतिबंधित असून त्यापैकी १३१६ इमारती बोरिवलीतील आहेत. बोरिवलीत सध्या एकूण बाधितांची संख्या १७ हजारापर्यंत गेली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ७३५ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ७३५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या २ लाख ७ हजार ४१ वर पोहोचली आहे.  दिवसभरात १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील एकूण करोनाबळींची संख्या ५ हजार २२६ इतकी झाली आहे.

’ रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील १८१, ठाणे शहरातील १७०, कल्याण-डोंबिवली शहरातील १६७, मीरा-भाईंदरमधील ९९, बदलापूर शहरातील ३०, उल्हासनगर शहरातील ३०, ठाणे ग्रामीणमधील २५, भिवंडी शहरातील २३ आणि अंबरनाथ शहरातील १० रुग्णांचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये मीरा-भाईंदरमधील ४, ठाणे शहरातील ३, नवी मुंबईतील ३, कल्याण-डोंबिवलीतील १ आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.