रुग्णालयातून पळालेल्या एका ८० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा सोमवारी ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. करोना व्हायरसच्या उपचारासाठी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजमध्ये हा व्यक्ती रहायचा. हा वयोवृद्ध माणूस आपल्या घराकडे परतत असताना ही दुर्घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

या व्यक्तीचा करोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कांदिवली पश्चिमेला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असताना आठ जून रोजी तो रुग्णालयातून निसटला. कांदिवली रेल्वे स्टेशनपासून हे रुग्णालय फार लांब नाहीय. तो रुग्णालयातून का बाहेर पडला? त्यामागे काय कारण आहे, ते स्पष्ट झालेले नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

संध्याकाळी सात वाजता तो कांदिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचला. रेल्वे रुळ ओलांडत असताना श्रामिक स्पेशल ट्रेनने धडक दिली. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्व पोलीस तो मृतदेह पुन्हा त्याच रुग्णालयात घेऊन गेले. तिथे चौकशीमध्ये हा रुग्णालयातून पळालेला पेशंट असल्याचे समोर आले. मृत व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याने त्याचे नातेवाईक क्वारंटाइनमध्ये आहेत. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह महापालिकेकडे देण्यात येणार आहे. ही आत्महत्या होती की, अपघात ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही.