मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच अचानक फे ब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यातच आज म्हणजे बुधवारी, २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असताना बुधवारी अचानक ही संख्या जवळजवळ दुप्पटीने वाढली आहे. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज हा आकडा थेट ५५० हून अधिकने वाढला आहे.

मुंबईत दिवसभरात (सायंकाळी सहावाजेपर्यंत) ११६७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या तीन लाख २१ हजार ६९८ इतकी झाली आहे. करोनावर मात करणाऱ्यांची आजची संख्या ३७६ इतकी होती. यामुळे करोनावर मात करणाऱ्या मुंबईकरांची संख्या तीन लाख एक हजार ५७ इतकी झालीय. शहरात सध्या आठ हजार ३२० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. करोनामुळे मुंबईत आज चार जणांचा मृत्यू झाला असून शहरात करोनामुळे मरण पावलेल्याची एकूण संख्या ११ हजार ४५३ इतकी झाली आहे. मुंबई जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतके आहे. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान मुंबईमध्ये करोनावाढीचा दर ०.२४ टक्के इतका आहे. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९४ दिवस इतका असल्याचे पालिकेने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.

१० फेब्रुवारीनंतर रुग्णवाढ

एक फेब्रुवारीला ३२८ पर्यंत असलेली मुंबईतील रुग्णसंख्या आता दैनंदिन एक हजाराच्या जवळ पोहोचली आहे. त्यातही वांद्रे पश्चिाम, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, वडाळा, अंधेरी पश्चिम, कुर्ला, ग्रॅन्ट रोड या भागात रुग्णवाढ अधिक आहे. या भागात दररोज प्रत्येकी ३५ ते ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तर अंधेरी पश्चिाम भागात दरदिवशीच्या रुग्णांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे. फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आटोक्यात असलेली रुग्णसंख्या १० फेब्रुवारीपासून वाढू लागली आणि रुग्णवाढीचा दरही हळूहळू वाढू लागला. १० फेब्रुवारीला ५५८ रुग्णांची नोंद झाली आणि त्यानंतर दररोज रुग्णांची संख्या सतत वाढतच असल्याचे आढळून आले आहे. मात्र त्यातही सुरुवातीला पूर्व उपनगरात रुग्णवाढीचा दर जास्त होता. त्यातही मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कु र्ला या परिसरात रुग्णवाढ जास्त होती. मात्र नंतर वांद्रे, ग्रँन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वारी, भांडूप या भागांतही रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. सध्या झोपडपट्ट्यांऐवजी इमारतींमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत.

डिसेंबरनंतर घसरला होता दर पण…

मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. त्यानंतर तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यात वांद्रे पश्चिाम, चेंबूर आणि मुलुंडचा समावेश आहे. त्याचबरोबर कु र्ला, वडाळा, ग्रॅन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वारी पश्चिाम भाग येथेही रुग्णवाढीचा दर जास्त आहे. मात्र करोनाच्या सुरुवातीच्या काळात वरळी, धारावी, मालाड, देवनार, भायखळा येथे रुग्णवाढ जास्त होती. तिथे यावेळी रुग्णांची संख्या कमी आहे.

लक्षणच दिसत नाहीत…

दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांच्या अहवालात कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित असल्याचे आढळून येत आहे, परंतु त्यांना लक्षणे नसतात. त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त असली तरी त्यात लक्षणे असलेले रुग्ण कमी आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.