करोनाच्या पाठोपाठ देशात अफवांचा व्हायरस देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून अशा अनेक अफवा सोशल मीडियावरच पसरू लागल्या होत्या. त्यामुळे करोनाी लढा देणाऱ्या प्रशासनासाठी हे काम अधिकच कठीण होऊन बसलं होतं. आता त्यामध्ये अजून एका अफवेची भर पडली आहे. ही अफवा इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागली, की काळजीपोटी खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाच त्यावर समोर येऊन खुलासा करावा लागला!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल केला जात आहे. यामध्ये मुंबईत जर सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही, तर त्यासाठी १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असं म्हटलं आहे. पण वास्तवात मुंबईत मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड ठोठावला जातो. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.

पुन्हा फेक न्यूज!

‘प्रिय मुंबईकर! आपल्याला फेक न्यूज विकणारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. यावेळी ते म्हणतात की मास्क घातला नाही, तर तुम्हाला १ हजार रुपये दंड केला जाईल. तुमच्या सुरक्षेशी झालेली तडजोड कितीही मोठी रक्कम असली, तरी भरून निघणार नाही. पण दंडाची रक्कम म्हणाल, तर मास्क न घातल्याबद्दल तुम्हाला मुंबईत २०० रुपये दंड ठोठावला जातो’, असं परमबीर सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

नुकतीच मुंबई महानगर पालिकेने अशा प्रकारे दंडातून किती रक्कम जमा केली, याची आकडेवारी समोर आली होती. यामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोना लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई महानगर पालिकेने आत्तापर्यंत तब्बल ३२ कोटी ४१ लाख १४ हजार इतकी रक्कम जमा केली आहे. तसेच, आत्तापर्यंत दंड करण्यात आलेल्या लोकांचा आकडा देखील १६ लाखांहून जास्त झाला आहे.

 

दरम्यान, करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असून मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रातही करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात वेळोवेळी धुणे या उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.