संशयाने एकदा डोक्यात घर केले तर त्याने स्वत:चे आणि कुटुंबाचे नुकसानच होते. याचेच धक्कादायक उदाहरण मुलुंड येथील वैशालीनगर येथे उघडकीस आले आहे. मद्याच्या आहारी गेलेला पती आपल्या पत्नीवर सतत संशय घेऊन मारहाण करत असल्याने कुटुंबाला भाडय़ाचे घर सोडावे लागले, त्यानंतर तात्पुरती सोय म्हणून राहायला गेले असता पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यातच दगडी पाटा घालून तिची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पतीला आपल्या पत्नीचे परिसरातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय वाटत होता, त्यावरून दोघांमध्येही सतत खटके उडत होते, मुलुंड पोलिसांनी या खुनी पतीला अटक केले आहे.

राजेश दंडवते (४०) पत्नी, कल्पना आणि दोन मुलांसह वैशालीनगर येथे राहात होता. राजेशला दारूचे व्यसन होते. कल्पना घर चालविण्यासाठी परिसरात घरकाम करत असे. आपल्या पत्नीचे परिसरातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याची शंका राजेशला होती. दोघांमध्ये त्यावरून सतत वादही होत. ते राहात असलेल्या घरमालकाने दंडवते कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले होते. त्यालाही पत्नीच जबाबदार असल्याचे राजेशला वाटत होते. बुधवारी रात्री कल्पनाने आपल्या मुलांना कल्याण येथील नातेवाईकांकडे पाठवले आणि दोघे मुलुंडच्या कामगार वसाहत येथे राहणाऱ्या कल्पनाच्या बहिणीकडे राहण्यास गेले.

संशयाने पोखरलेल्या राजेशला पत्नीमुळेच हे सर्व घडत असल्याचे वाटत होते. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्नी झोपलेली पाहून राजेशने घरातील दगडी पाटा कल्पनाच्या डोक्यात घातला आणि पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात कल्पनाला पाहून शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आरडाओरडा केली, कल्पनाला कामगार रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याला मिळाली असता, साहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, महेंद्र पुरी, निवृत्ती महाले, मोरे, तपास अधिकारी सविता चव्हाण यांनी राजेशला दोन तासांत शोधून त्याला अटक केली.