News Flash

मुंबईतील दादरमध्ये ८५ लाखांच्या नवीन नोटा जप्त; ७ अटकेत

काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

काळा पैसा पांढरा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू असतानाच आज, शुक्रवारी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दादरमध्ये नवीन नोटा असलेली ८५ लाखांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असून, यामागे काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, गुजरातमधील सूरतमध्येही ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर देशभरात ठिकठिकाणी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या रद्द केलेल्या नोटा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याचदरम्यान अनेक ठिकाणी नव्याने चलनात आलेल्या नोटाही पकडण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आज मुंबईत कारवाई करून नवीन नोटा असलेली ८५ लाखांची रोकड जप्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर हिंदू कॉलनीजवळ सात जण नोटा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या सापळ्यात नोटा घेऊन येणारे सात जण अलगद अडकले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडे नवीन नोटा असलेली ८५ लाखांची रोकड सापडली. त्यांना अटक केली आहे. ज्या कारमधून नोटा घेऊन आले होते, ती कारही जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सर्वसामान्यांना बँकेतून खर्चालाही पैसे मिळत नाहीत. अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तर दुसरीकडे नवीन नोटा असलेली लाखोंची रोकड पकडण्यात येते. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आले कुठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हे पैसे नेमके कसे आले? यामागे काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट मुंबई आणि परिसरात कार्यरत नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उकल गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, गुजरातमधील सूरतमध्येही नवीन नोटा असलेली ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 5:40 pm

Web Title: mumbai crime branch seizes new notes worth rs 85 lakhs from dadar
Next Stories
1 Maratha Reservation : ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- मुख्यमंत्री
2 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आमदार, खासदारांनी घेतली भुजबळांची भेट- ईडी
3 मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने
Just Now!
X