पूर्व उपनगरातील घाटकोपर परिसरातून एका बांधकाम व्यावसायिकाच्या २१ वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या सुटकेसाठी दोन कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले होते. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. तब्बल तीन युनिटचे विशेष पथक तपासकामासाठी तैनात करण्यात आले होते.

काही केल्या अपहरणकर्त्यांचा शोध लागत नव्हता. मोबाइलच्या माध्यमातून अपहृत मुलाच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी पाठवणे तसेच प्रसंगी त्याची ध्वनिचित्रफीत तयार करून मेमरी कार्ड पाठविणे आदी माध्यमातून खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. धमकीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे अन्वेषण विभागाकडून केला जात होता. परंतु त्यात काहीही यश येत नव्हते. हे पथकही हतबल झाले होते. तब्बल महिन्याभरानंतर खंडणीची दोन कोटी रक्कम मिळाल्यानंतरच अपहृताची सुटका करण्यात आली होती.

स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही चांगलीच चपराक होती. आतापर्यंतच्या इतिहासात अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही, असे कधीही झाले नव्हते. त्यामुळे या अपहरणकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधण्याचा ध्यास आता सेवानिवृत्त झालेल्या सहायक आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी घेतला. अपहरण प्रकरणात पोलिसांकडून खूपच सावध पवित्रा घेतला जातो. थोडीशी कुणकुण लागली तरी अपहृताच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, याची कल्पना असल्यामुळे सावधपणे कुठलीही पावले उचलली जातात. महिनाभर चाललेल्या या अपहरणनाटय़ामध्ये अपहरणकर्त्यांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून विविध मोबाइल फोनद्वारे धमक्या दिल्या जात होत्या. महिनाभराच्या काळातील मोबाइल क्रमांकाच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन युनिटचे वरिष्ठ निरीक्षक अनुक्रमे श्रीपाद काळे, व्यंकट पाटील आणि अशोक खोत यांच्यासह प्रवीण तेजाळे, अशोक घाडीगावकर,  परब, संजय सुर्वे आदी तब्बल २३ अधिकारी आणि ३४ शिपायांचे पथक तपासाच्या कामात जुंपले होते.

अपहरणकर्त्यांच्या ताब्यात तब्बल महिनाभर राहिलेला सदर मुलगा खूपच घाबरलेला होता. त्याच्यामध्ये भोसले यांनी विश्वास निर्माण केला आणि त्याच्याकडून अपहरणकर्त्यांबाबत विविध माहिती काढून घेतली. सदर मुलाला ज्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी त्याला जेवण घेऊन दररोज मनीष नावाचा तरुण येत असे. परंतु एकेदिवशी तो आला नाही. त्या वेळी मनीषला मुलगा झाला आहे आणि त्यामुळे तो मुंबईला गेला आहे, अशी चर्चा सदर अपहृत मुलाने अपहरणकर्त्यांकडून ऐकली होती. अशी बरीच माहिती सदर मुलाने सहायक आयुक्त भोसले यांना दिली. परंतु तोपर्यंत भोसले यांना तपासासाठी एक दुवा मिळाला होता. या दुव्याच्या आधारे पोलीस पथकाने त्या काळातील मुंबईतील रुग्णालये, प्रसुतिगृहे तसेच खासगी नर्सिग होम पिंजून काढली. विशिष्ट दिवशी सुकेशनी मनीष गांगुर्डे ही प्रसूत झाल्याची माहिती मिळाली आणि या प्रकरणाची उकल झाली, याबाबत भोसले ठाम होते. मनीषला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या इतर साथीदारांबाबत माहिती मिळविणे पोलिसांना कठीण गेले नाही. त्यानंतर एका महिलेसह तब्बल नऊ जणांना अटक करून अपहरणाची उकल करण्यात भोसले यांच्या पथकाने यश मिळविले. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी ७० लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली. याशिवाय गुन्ह्य़ात वापरण्यात आलेली टाटा सफारी, इनोव्हा, इंडिका अशा तीन गाडय़ा तसेच विदेश बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या टोळीचा सूत्रधार अजित अपराज मेकॅनिकल पदविकाधारक असल्याचे निष्पन्न झाले. नोकरी करण्यापेक्षा झटपट श्रीमंत होण्याच्या वेडापायी गुन्हेगारी कारवायांकडे वळला होता, असे तपासात स्पष्ट झाले. त्याची पत्नी भारती अपराज हीदेखील त्याला या कारवायांमध्ये साथ देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अजितने अल्पावधीतच आपली टोळी तयार केली होती. ३० ते ४० वर्षे वयोगटातील त्याचे सर्व साथीदार हे बेरोजगार होते. या माध्यमातून कोटय़वधी रुपये मिळत असल्यामुळे ते सर्वच खूश होते.

वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या एका ५४ वर्षे वयाच्या व्यावसायिकाला गाडी विकण्याच्या बहाण्याने दहिसर येथे बोलावून त्यांचे अपहरण केले. नालासोपारा येथील गोदामामध्ये डांबून ठेवून पहिल्यांदा १२ लाखांची खंडणी अजितच्या नेतृत्वाखाली या टोळीने उकळली. त्यानंतर अधिकच विश्वास बळावल्याने अजितने आपला शाळामित्र असलेल्या व्यावसायिकाच्या तीन वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण केले. आपल्याच मित्राकडून मुलाच्या सुटकेसाठी त्याने तब्बल ८० लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. गुंगीचे औषध देऊन गाडय़ा चोरी करण्याचे रबाळे आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेही या पथकाने उघड केले आहेत.

या प्रकरणातही भोसले यांच्या पथकाने कसून शोध घेतल्यामुळे अजितच्या कारवाया उघड झाल्या. अन्यथा आणखी एका अपहरणाच्या आणि खंडणीवसुलीच्या तयारीत ही टोळी होतीच..

@ndsrwankar

nishant.sarvankar@expressindia.com