शेजारी राहणाऱ्या महिलेकडून हत्या

घोडपदेव-भायखळा येथील मानवी इंगळे या पाच वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात भायखळा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी इंगळे कुटुंबीयांच्या शेजारी राहणाऱ्या रेखा सुतार या महिलेला पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळा तपासणी  पुराव्याच्या आधारे शुक्रवारी अटक केली. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून तसेच मानसिक संतुलन ढासळल्यामुळे रेखा हिने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

विघ्नहर्ता इमारतीच्या १५ व्या मजल्यावर इंगळे कुटुंबीय भाडय़ाने राहातात. मानवीचे वडील अशोक इंगळे यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय आहे तर आई आरती या वरळी वाहतूक मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. १९ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानवीला १५ व्या मजल्यावरुन फेकून दिले होते. इंगळे दाम्पत्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सुरुवातीपासूनच रेखा हिच्यावर संशय होता. ही घटना घडली त्या दिवशी रेखाचे इंगळे कुटुंबीयांबरोबर भांडणही झाले होते. मात्र तिच्याविरोधात ठोस पुरावा नव्हता. मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार हे कृत्य रेखानेच केल्याचे स्पष्ट झाले आणि

पोलिसांनी तिला अटक केली. रेखाचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी सांगितले.