मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने एका महिलेला २,५०० डॉलर्स चोरीच्या प्रकरणात अटक केली. या महिलेला अटक केल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. २००६ पासून तब्बल ५० वेळा या महिलेला वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये अटक झालेली असून, ती प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधते, अशी माहिती समोर आली आहे. फॅशन डिझायनर असलेल्या दीपिका गांगुली यांच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी या महिलेला अटक केली.

वनिता गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. पकडले जाऊ नये म्हणून ही महिला प्रत्येकवेळी नाव बदलते. विले पार्ले पश्चिम येथे राहणाऱ्या दीपिका गांगुली यांनी २६ मे रोजी घरात चोरी झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

आरोपी महिलेनं दीपिका गांगुली यांच्या घरकाम करण्याची नोकरी मिळवली. यावेळी गांगुली यांनी तिच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रे हरवली असून, काही दिवसांत जमा करते, असं महिलेनं म्हटलं होतं. त्यानंतर दहा दिवसांतच वनिता गायकवाड हिने रोख रक्कम चोरली आणि तेव्हापासून गायब होती.

हेही वाचा- माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिलेची ओळख पटवण्यात आली. त्याचबरोबर गुन्ह्यांच्या नोंदींच्या आधारे तिला किती वेळा अशा प्रकरणात अटक झालेली आहे, याची माहिती समोर आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. “आरोपी महिलेला आतापर्यंत ५० वेळा अटक करण्यात आलेली आहे. इतकंच नाही, तर तिला अनेकवेळा दोषीही ठरवलं गेलं आहे,” असं प्रॉपर्टी सेलमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- चित्रपट, जाहिरातींमध्ये काम देतो सांगून लोकांना लुबडणारा ‘स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर’ पोलिसांच्या जाळ्यात!

चोरी कुठे करायची? हे ही महिला कशी ठरवते याबद्दलही पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. “ही महिला सोसायटीच्या वॉचमनशी संपर्क करते. त्याचा नंबर घेते, त्याला स्वतः नंबर देते. कोविडमुळे घरगुती काम कामं करणाऱ्या महिला गावाकडे निघून गेलेल्या आहेत आणि आता त्यांची मागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारे आरोपी महिला कामं मिळवते. वनिता गायकवाड हिला विक्रोळी येथे अटक करण्यात असून, तिला दोन मुलं आहेत. तिची दोन्ही मुलं वेगळी राहतात, अशी माहितीही पोलिसांनी दिली.