अंधेरी येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात जाणारा दादाभाई नौरोजी मार्गावरील पादचारी पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे पालिकेने केलेल्या मुंबईतील पुलांच्या संरचनात्मक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेत अनेक जणांना प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. ती विचारात घेऊन पालिका प्रशासनाने मुंबईतील २९६ पुलांच्या संरचनात्मक तपासणीसाठी सल्लागाराची नेमणूक केली. त्यानंतर प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या हद्दीतील पुलांच्या संरचनात्मक तपासणीला वेग आला होता. मात्र पालिकेच्या हद्दीतील पुलांची तपासणी पूर्ण झालीच नव्हती.

अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर संरचनात्मक तपासणीच्या कामाने वेग घेतला. पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ही तपासणी करण्यात आली.  या तपासणीदरम्यान १४ पूल अतिधोकादायक असल्याचे आढळून आले, तर १७६ पुलांची छोटय़ा प्रमाणात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. दादाभाई नवरोजी पुलाची छोटय़ा प्रमाणात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे या तपासणीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र आता गुरुवारी घडलेल्या पुलाच्या दुर्घटनेमुळे पालिकेच्या संरचनात्मक तपासणीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे यामधील पुलांची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या सल्लागारांनी ३१४ जुने पूल, पादचारी पूल, स्काय वॉक, भुयारी मार्ग यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

कोटय़वधींची तरतूद

पालिकेने येत्या आर्थिक वर्षांत मुंबईतील धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बाधणी करणे, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल बांधणे अशी कामे हाती घेतली आहेत. मोठय़ा प्रमाणावर पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्गाचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यात वरळी, दादर, माटुंगा, माहीम येथील महत्त्वाच्या उड्डाणपुलांचाही समावेश आहे. टप्प्याटप्प्याने या पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. यापैकी काही पुलांची मोठी संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे या पुलांचा वापर अनेक पटीने जास्त होत आहे. त्यामुळे या पुलांच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेने या आर्थिक वर्षांत पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. या अर्थसंकल्पात पूल या विभागाच्या भांडवली खर्चासाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांत ही तरतूद केवळ ३९३ कोटी होती. पालिकेने येत्या आर्थिक वर्षांत मुंबईतील धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बाधणी करणे, पुलांची दुरुस्ती, नवीन पूल बांधणे अशी कामे हाती घेतली आहेत.

टिळक पुलाबाबतही प्रश्नचिन्ह

लोअर परळ येथील पूल तातडीने पाडण्यात आल्यानंतर दादरचा सर्वात जुना टिळक पूलही पाडण्याची आवश्यकता रेल्वेने व्यक्त केली होती. मात्र पालिकेने केलेल्या तपासणीनंतर टिळक पुलाची केवळ मोठी दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे याबाबतच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पालिकेने टिळक पुलाची मोठी दुरुस्ती हाती घेतली होती. या विसंगतीमुळे सर्वसामान्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

पुलांचे सर्वेक्षण

  • सर्वेक्षण केलेले पूल – ३१४
  • पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता असलेले – १४
  • उत्तम स्थितीत असलेले पूल – ७७
  • मोठय़ा दुरुस्तीची आवश्यकता असलेले पूल – ४७
  • डागडुजीची गरज असलेले पूल – १७६
  • या कामांसाठी तरतुद – १०८ (कोटी रुपये)

(अर्थसंकल्पात दिलेल्या आकडेवारीनुसार)