22 July 2019

News Flash

लाद्यांच्या भाराने पूल कोसळला?

सुशोभीकरणामुळे दुर्घटनेचा संशय

स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने केलेल्या सुशोभीकरणामुळे दुर्घटनेचा संशय

‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचे सुशोभीकरण करताना हिमालय पुलावर बसविण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांमुळे भार वाढला आणि हा भार सोसण्यास असमर्थ ठरलेला पूल गुरुवारी कोसळल्याचा संशय पालिकेतील काही अधिकारीच व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’साठी देशभरातील मोठय़ा शहरांमधील ठरावीक पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराची निवड झाली होती.  या परिसरातील हिमालय पुलाचे सुशोभीकरण, पदपथांची दुरुस्ती, इमारती एकसमान दिसाव्या यादृष्टीने रंगरंगोटी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. हिमालय पूल आकर्षक दिसावा यासाठी त्यावरील लाद्या बदलण्याचे आणि पुलाची रंगरंगोटी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुलावर आकर्षक अशा लाद्या बसविण्यात आल्या. या कामासाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च करण्यात आले. लाद्या बसविताना विशेष काळजी घेण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्यामुळे पुलावरील भार वाढला. कालांतराने हा भार सोसणे पुलाला शक्य झाले नाही आणि तो गुरुवारी कोसळला, असे पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. संरचनात्मक तपासणीमध्ये ही बाब तांत्रिक सल्लागाराच्या लक्षात यायला हवी होती. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

या पुलाची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्याची गरज होती. त्यानंतर सुशोभीकरण करण्यात आले असते तर गुरुवारी दुर्घटना घडली नसती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पुलांच्या दयनीय स्थितीबाबत २२ मार्चला सुनावणी

  • मुंबईतील विविध प्रकारच्या पुलांच्या दयनीय स्थितीबाबत दाखल जनहित याचिकेवर २२ मार्चला सुनावणी होणार आहे.
  • गुरुवारी सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रदीप भालेकर यांनी मुंबईतील पुलांच्या दयनीय स्थितीबाबत केलेली जनहित याचिका शुक्रवारी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली.
  • गुरुवारच्या दुर्घटनेच्या धर्तीवर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच आणखी दोन जनहित याचिका करण्यात येणार आहेत. त्या पुढील आठवडय़ात त्या सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
  • प्रभादेवी-परळ स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर भालेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
  • विशेष समिती स्थापन करून या समितीने मुंबईतील सगळ्या प्रकारच्या पुलांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.

मुंबईतील सर्वच पुलांच्या फेरतपासणीचे आदेश

हिमालय पूल दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात केलेल्या शिफारशीनुसार मुंबईमधील सर्वच पुलांची पुन्हा संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी दिले. मात्र या कामासाठी संबंधित तांत्रिक सल्लागारांना वेगळे पैसे देण्यात येणार नाहीत, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते. प्रमुख अभियंत्यांनी या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला असून त्यात पुलांच्या संरचनात्मक तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हिमालय पूल दुर्घटना प्रकरणाची दखल घेत मुंबईतील सर्वच पुलांची पुन्हा संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी संबंधित तांत्रिक सल्लागार कंपन्यांना दिले आहेत. फेरतपासणीअंती पुलांबाबत कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मात्र या कामासाठी या कंपन्यांना वेगळे पैसे देण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.हिमालय पुलाच्या संरचनात्मक तपासणीवरून वादग्रस्त ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस्ट कंपनीला दिलेली सर्व कामे काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कंपनीकडील पुलांची फेरतपासणी अन्य तांत्रिक सल्लागाराकडून करून घेण्यात येणार आहे.

कोसळलेल्या पुलाचा सांगाडा हटविला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील गुरुवारी कोसळलेल्या हिमालय पुलाचा सांगाडा हटविण्याचे काम शुक्रवारी दुपारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. हे काम शनिवारी पहाटेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोअर परळ उड्डाणपुलाच्या पुनर्उभारणीत अडथळा

पश्चिम रेल्वेवर धोकादायक ठरलेला लोअर परळ स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाच्या पुनर्उभारणीत अतिक्रमणांचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे या पुलाची पुनर्बाधणी होण्यास विलंब होत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. हा पूल नऊ महिन्यात बांधला जाणार आहे. लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याने  पूल बंद केला होता. या पुलाची पश्चिम रेल्वेकडून पुनर्उभारणी केली जाणार आहे. तर पालिकेकडूनही सहकार्य केले जाईल. पुलाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. पुनर्उभारणीसाठी ८४ कोटी रुपये खर्च आहे.  मात्र हे काम करण्यात पुलाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या काही अतिक्रमणांचा अडथळा ठरत आहे.

आठ ते दहा घरे या पुलाखाली असून त्यांना अन्यत्र जागा देण्यात येत आहे. परंतु येथील रहिवासी तयार नसल्यामुळे पुनर्उभारणीच्या कामांत अडथळा येत असून येथील काम सुरू झाले नसल्याची अशी माहिती  पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर आझाद मैदान पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती शासकीय यंत्रणांसोबत खासगी संस्थांपर्यंत असल्याने पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांना आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दुर्घटनेत ठाण्यातील एकाचा मृत्यू

मुंबईतील सीएसएमटी परिसरात पादचारी पूलाच्या दुर्घटनेत  ठाणे येथील किसननगर भागात राहणारे मोहन कायंगुडे (५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.  मुंबई येथील झवेरी बाजार परिसरातील एका सोनाराच्या दुकानात कायंगुडे काम करत होते. आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. गुरुवारी रात्री घरी परतण्यासाठी सीएसएमटी स्थानकावर येताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

First Published on March 16, 2019 1:12 am

Web Title: mumbai cst foot overbridge collapse 2