मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्क्य़ांवर पोहोचले असून आतापर्यंत ५७ हजार १५२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला मुंबईत २३ हजार २३९ सक्रिय करोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

मुंबईमध्ये सोमवारी एक हजार २०१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालवरुन स्पष्ट झाले. परिणामी, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ८५ हजार ३२६ वर पोहोचली. विविध रुग्णालयांमध्ये सोमवारी ७६२ करोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात एक हजार २६९ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तसेच सोमवारी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार हजार ९३४ झाली आहे. रुग्णांची एकूण आकडेवारी आणि बरे झालेले व मृत्युमुखी झालेल्यांची संख्या लक्षात घेता आजघडीला मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये २३ हजार २३९ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी काळ ४४ दिवस झाला आहे. बाधित रुग्ण सापडल्यामुळे ७५० ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली असून सहा हजार ५५२ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापर्यंत तीन लाख ५९ हजार १५९ व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली आहे.

राज्यात २०४ रुग्ण दगावले

राज्यात सोमवारी ५,३६८ रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या २,११,९८७ वर पोहोचली. राज्यात गेल्या २४ तासांत २०४ रुग्ण दगावल्यामुळे करोना बळींचा आकडा ९,२०६ झाला आहे. गेल्या २४ तासांत ३,५२२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १,१५,२६२ झाली आहे.