मुंबईतील करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी २,३४७ रुग्ण करोनामुक्त झाले. तर दिवसभरात २,२८७ जणांना करोनाची बाधा झाली असून ४७ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत एकीकडे करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे बाधित रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणा ८४ टक्क्य़ांवर पोहोचले असून आतापर्यंत मुंबईतील एक लाख ८९ हजार २२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोना चाचणीअंती आज २,२८७ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या दोन लाख २५ हजार ४८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ४७ रुग्णांमध्ये ३७ पुरुष, तर १० महिलांचा समावेश होता. त्यापैकी ३६ जणांना दीर्घकालीन आजार होता. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९,३४० वर पोहोचली आहे.

मुंबईमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या १,७५० करोनाबाधित रुग्णांची दुहेरी नोंदणी झाली होती. तसेच त्यात मुंबई बाहेरील काही रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतून ही संख्या वगळण्यात आली आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये २३ हजार ८६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईत करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत १२ लाख ३२ हजार ८३८ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ९,८६३ इमारती टाळेबंद करण्यात आल्या असून ६४५ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील २० हजार २७६ शोध घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात १,७४७ जणांना संसर्ग 

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ७४७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकुण रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजार ६१ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात ४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ४ हजार ७७७ इतका झाला आहे. जिल्ह्यत शुक्रवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ४००, कल्याण-डोंबिवली शहरातील ३६७, नवी मुंबईतील ३५६, ठाणे ग्रामीणमधील २४९, मीरा-भाईंदरमधील १९५, बदलापूरमधील ५२, अंबरनाथमधील ४४, भिवंडी शहरातील ४३ आणि उल्हासनगरमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. तर, शुक्रवारी जिल्ह्य़ात ४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ठाणे ग्रामीणमधील १४, कल्याण-डोंबिवलीतील ९, मीरा-भाईंदरमधील ७, ठाणे शहरातील ६, नवी मुंबईतील ४, भिवंडीतील ३ आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

देशातील रुग्ण ६९ लाख

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या ७० हजार ४९४ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या ६९ लाख सहा हजार १५१ झाली आहे. महिनाभरात देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या नऊ लाखांच्या खाली गेली आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दिवसभरात करोनाच्या ९६४ रुग्णांचा मृत्यूू झाल्याने देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख सहा हजार ४९० वर गेली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८५.५२ टक्के असून आतापर्यंत ५९ लाख सहा हजार ६९ जण बरे झाले आहेत.