उकाडय़ाने राज्य व मध्य भारतातील नागरिक त्रस्त असतानाच आज, २५ मेपासून ‘नवतपा’ सुरू होत आहे. रोहिणी नक्षत्राचा प्रभाव गुरुवारपासून सुरू होत असून या नऊ दिवसांच्या काळात वाढत्या तापमानासोबतच पाऊस आणि वादळाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान राज्यातील तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणात  वाढ झाल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे.

मंगळवारीच चंद्रपूरमध्ये ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली असून या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे.  नवतपाच्या काळात सूर्य डोक्यावर येत असून त्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात. या दिवसात तापमान अधिक तर उष्णतेच्या लहरीसुद्धा वेगाने वाहतात. २५ आणि २६ मे या दोन दिवसात तापमान अधिक राहील, तर २७ आणि २८ मे रोजी सायंकाळी वादळाची शक्यता असून या काळात आकाशात ढग राहू शकतात. २९ ते ३१ मे दरम्यान पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ३१ मे २ जूनपर्यंत पुन्हा एकदा राज्याला तापमानाचा तडाखा अनुभवावा लागू शकतो.

नवतपाच्या काळात विदर्भ ते मध्यभारतात उन्हाचा सर्वाधिक तडाखा नागरिक अनुभवतात. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने नवतपाच्या आगमनाची नांदी दिली आहे. दिवसा प्रचंड तापणारे शहर रात्रीसुद्धा थंड होत नाही.

काय आहे नवतपा?

नवतपा ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आली आहे. रोहिणी नक्षत्रात सूर्याने प्रवेश केल्यानंतर तो डोक्यावर असतो आणि सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे या काळात उन्ह चांगलेच तापते. कधीकधी रोहिणी नक्षत्रात पाऊस आणि वादळी वाऱ्यांचीही शक्यता असते. मात्र, बरेचदा याच काळात तापमानाचे उच्चांक नोंदवले गेले आहेत.

मोसमी वारे पुढच्या प्रवासाला

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळसदृश स्थितीमुळे गेले दहा दिवस अंदमान बेटांवर अडकून पडलेले मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या दिवसभरात हे वारे बंगालच्या उपसागरात पुढे जातील, असा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यावर्षी नियमित वेळेपेक्षा सहा दिवस आधी मोसमी वारे अंदमान बेटांवर पोहोचले. मात्र त्यानंतर हे वारे पुढे सरकले नाहीत.