मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाह सोहळा १९ मे रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात आता चर्चा रंगली आहे ती मुंबईच्या डबेवाल्यांची. मुंबईच्या डबेवाल्यांनी मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नासाठी डबेवाल्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीचा पोशाख पाठवण्याचे नक्की केले आहे. महाराष्ट्रातील लग्नांमध्ये पारंपरिक पद्धतीने जो पोशाख घातला जातो तसाच पोशाख मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल या दोघांना पाठवण्याचे ठरवले आहे. गुरुवारी या पोशाखाची खरेदी करण्यात आली.

एवढेच नाही तर मुंबईच्या डबेवाल्यांनी १९ मे रोजी या शाही विवाह सोहळ्याचे सेलिब्रेशन भारतातही साजरे करण्याचे ठरवले आहे. मुंबईमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल येथे मिठाई वाटून हे डबेवाले राजकुमाराच्या लग्नाच्या आनंदात सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनोख्या पद्धतीने केले जाणारे हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. १९ मे रोजी होणाऱ्या राजकुमाराच्या लग्नाच्या दिवशी आपले काम करुन डबेवाले हे विशेष काम करणार आहेत.

आपल्या नातेवाईकाच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या इलाजासाठी या तिन्ही हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही घरचे डबे पोहचविण्याचे काम डबेवाल्यांकडून केले जाते. प्रिन्स हॅरी भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी आपल्याला लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले होते त्यामुळे डबेवाल्यांचा त्यांच्याशी भावनिक संबंध आहे.

मेगन मार्केल हीच्यासोबत राजकुमार हॅरी यांचे लग्न होणार असून हॅरी यांचे वय ३३ वर्षे तर मार्केल हीचे वय ३६ वर्षे आहे. विंडसर येथील सेंट जॉर्ज चॅपेल येथे हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार असून त्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल. एएनआयने यासंदर्भातील ट्विट केले असून डब्बेवाला संघटनेतील २ जण ब्रिटनमध्ये या सोहळ्याला उपस्थित राहतील असेही त्यामध्ये म्हणण्यात आले आहे.