मुंबई: रेल्वे मंत्रालयाने राजधानी गाडय़ांच्या केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने पहिला क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छतेत एकूण तीन प्रीमियम गाडय़ांनी टॉप १० मध्ये क्रमांक प्राप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

भारतातील प्रीमियम ट्रेनमध्ये असलेली स्वच्छता या संदर्भात एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. जवळपास १५ हजार प्रवाशांच्या प्रतिक्रिया, मत विचारात घेण्यात आली. यात एकूण २३ राजधानी गाडय़ांपैकी मुंबई-दिल्ली राजधानीने प्रथम क्रमांक  पटकावला आहे. तर अहमदाबाद ते नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्स्प्रेस सातवा आणि ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस दहाव्या क्रमांकावर आहे. नॉन-प्रीमियम गाडय़ांमध्ये वांद्रे टर्मिनस ते जयपूर अमरापूर अरावली एक्स्प्रेस दुसऱ्या स्थानावर असल्याचे सांगितले.

गाडय़ांच्या डब्यातील साफसफाई, प्रसाधनगृहांतील स्वच्छता, चादरींची सफाई, हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांची प्रणाली, कचरा डब्यांची उपलब्धता असे अनेक मुद्दे विचारात घेण्यात आले.