धुमसणारा धूर मात्र कायम; मॅग्नेशियम क्लोराइडच्या फवारणीचा निर्णय
अंधाराचे साम्राज्य आणि मोकाट कुत्र्यांचा स्वैर संचार यांचा सामना करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी रात्री अथक प्रयत्नांअंती देवनार कचराभूमीत लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. कचराभूमीत तीन-चार ठिकाणी धुमसणाऱ्या कचऱ्यातून सोमवारी धुराचे लोट बाहेर पडत होते. कचऱ्याखाली धुमसणाऱ्या आगीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यावर मॅग्नेशियम क्लोराइडची फवारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर कचराभूमीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्या बुधवारी मध्यरात्रीनंतर देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल आणि पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी रविवारी रात्री राबविलेल्या धडक मोहिमेमुळे कचराभूमीतील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मिट्ट काळोखात गाडय़ांचे दिवे आणि अग्निशामकांकडील बॅटरीच्या उजेडात रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. अंधाराच्या साम्राज्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास जवानांना भेडसावत होता. अंधारातच कचराभूमीतील खड्डेमय रस्त्यातून अग्निशमन दलाच्या गाडय़ा आणि पाण्याचे टँकर संथगतीने घटनास्थळी रवाना करावे लागत होते. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला देवनार पशुवधगृहातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. आता राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझरमधून पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी कचराभूमीला भेट देऊन पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील, ‘निरी’चे संचालक राकेश कुमार, एम-पूर्व विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. कचराभूमी धुमसत असताना तेथे भटकी कुत्री, गाई आणि म्हशींचा मोठय़ा प्रमाणावर वावर सुरू होता. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी सुरक्षारक्षकांची खरडपट्टी काढली. तसेच तात्काळ भटकी कुत्री आणि अन्य जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश अजय मेहता यांनी दिले.कचराभूमीत डेब्रिजचा वापर करून अग्निशमन दलाच्या गाडय़ांसाठी तात्पुरता रस्ता तयार करावा. आग विझल्यानंतर सुधारित स्वरूपातील रस्ता तयार करावा. येथे सध्या ३६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून त्यांची संख्या १०३ पर्यंत वाढविण्यात यावी. तसेच कचराभूमीत संबंधित अधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश देऊ नये, असे आदेश अजय मेहता यांनी दिले. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, अशीही सूचना त्यांनी केली.
कचराभूमीत मॅग्नेशियम क्लोराइडची फवारणी केल्यास आगीस प्रतिबंध होऊ शकेल, अशी माहिती ‘निरी’चे संचालक राकेश कुमार यांनी दिली.

मानवी साखळीचे आयोजन
‘देवनार कचराभूमी हटाव’ अशा घोषणा देत बैगनवाडी, शिवाजीनगर, रफिकनगरमधील रहिवाशांनी समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखाली सोमवारी देवनारमध्ये मानवी साखळीचे आयोजन केले होते. या आंदोलनात मोठय़ा प्रमाणावर लहान मुले आणि महिला सहभागी झाल्या होत्या. या कचराभूमीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून येथील सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे ही कचराभूमी बंद करावी, अशी मागणी गटनेते रईस शेख यांनी या वेळी केली.
वैद्यकीय शिबीर
धुरामुळे त्रास झालेल्या रहिवाशांच्या तपासणीसाठी नगरसेवक सिराज शेख यांनी रफिकनगर येथील नव्या बस आगाराजवळ वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सोमवारी अनेकांनी तपासणी करून घेतली. तसेच काही जणांना आवश्यक ती औषधे देऊन घरी पाठविण्यात आले. मंगळवारीही हे शिबीर सुरू राहणार आहे.