मुंबईच्या प्रारूप विकास आराखडय़ात जाणीवपूर्वक गंभीर चुका ठेवण्यात आल्या का, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीही पावले टाकली जाणार आहेत.
मुंबईच्या प्रारूप विकास आराखडय़ातील गंभीर चुका व त्रुटी दूर करून नव्याने प्रारूप आराखडा पुढील चार महिन्यांत प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या चुका जाणीवपूर्वक ठेवण्यात आल्या होत्या का, त्यामागील सूत्रधार कोण, त्याची चौकशी करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. त्याचबरोबर चुकांबाबत चौकशी करावी, अशी भूमिका शिवसेनेनेही घेतली आहे. त्यामुळे आता मुख्य सचिवांकडून याबाबतही चौकशी होणार आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. त्यातील चुकांसाठी प्रशासन जबाबदार आहे. शिवसेनेनेही या आराखडय़ास विरोध केला होता, असे शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.