महिला रुग्णावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी मुंबईतील एका ५८ वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ क्लिप बनवून ती ऑनलाइन पोस्ट केल्याचाही डॉक्टरवर आरोप आहे. हॉलिडे कोर्टाने रविवारी आरोपीला १७ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणी जोगेश्वरी पूर्वेला आपल्या आई-वडिलांसोबत राहते. २०१५ साली आपण आरोपी डॉक्टरच्या संपर्कात आलो असे तिने पोलिसांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित तरुणी मूळव्याधाच्या आजाराने ग्रस्त होती. आरोपी डॉक्टर तिच्यावर या आजारासाठी उपचार करत होता. पीडित तरुणीला वेदना होत असल्याने २८ मे २०१५ रोजी डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर तिला झोप लागली. जेव्हा ती घरी आली तेव्हा आरोपी डॉक्टरने तिच्या मोबाइलवर एक क्लिप पाठवली होती. या व्हिडिओमध्ये ती आणि आरोपी डॉक्टर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये होते.

याबद्दल कुठे वाच्यात करु नको अशी धमकी डॉक्टरने दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा पीडित तरुणी जाब विचारण्यासाठी आरोपी डॉक्टरच्या क्लिनिकवर पोहोचली. तेव्हा त्याने शारीरिक संबंधांना नकार दिल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तिला अनेक वेळा कोणी नसताना क्लिनिकवर बोलावले व तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये पीडित तरुणीचे लग्न झाले व ती मालाडला नवऱ्याच्या घरी गेली. तिने डॉक्टरबरोबर सर्व संबंध तोडले पण अलीकडेच हा डॉक्टर पुन्हा पीडित तरुणीच्या संपर्कात आला. त्याने पुन्हा लैंगिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव टाकला.
आपले म्हणणे ऐकले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. पण यावेळी तरुणी ठाम राहिली व त्याचे म्हणणे ऐकले नाही. तीन ऑक्टोंबरला पीडित तरुणीच्या नवऱ्याच्या मोबाइलवर तिची आणि डॉक्टरची क्लिप आली. जेव्हा त्याने याबद्दल आपल्या बायकोला जाब विचारला तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे नवरा-बायको पोलीस स्टेशनला गेले व आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवली. पुरावा म्हणून ती व्हिडिओ क्लिप पोलिसांकडे दिली. शनिवारी आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली.