धुळ्यात जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टरवरील हल्ल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात ठिकठिकाणाहून निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी मुंबईतील आझाद मदानात सुमारे ५०० ते ६०० डॉक्टरांनी या हल्ल्याविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले. पालिका व सरकारी रुग्णालयातील सुरक्षितता आणि दुरावस्था, निवासी डॉक्टरांवरील अतिरिक्त ताण असे विविध प्रश्न यावेळी डॉक्टरांनी मांडले.

या आंदोलनासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट (एएमसी) या संघटनांचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. २०१० मध्ये डॉक्टरांवरील हल्ल्यांसंदर्भातील कायदा अपूरा असून त्याची अंमलबजावणीही केली जात नाही.

सरकारी रुग्णालयातील सद्यस्थिती भीषण असून अशा परिस्थितीत डॉक्टरांना दहशतीखाली काम करावे लागत आहे, अशी भावना ‘आयएमए’चे डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केली. तर ‘एएमसी’कडून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना पत्र पाठविण्यात आले आहे. यात धुळे येथील डॉक्टरवरील हल्ला प्रकरण गांभीर्याने घेऊन हा खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवाव, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय सरकारी रुग्णालयात सुरक्षेचा अभाव, कायद्याअंतर्गत डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची शिक्षा सात वर्षांपर्यंत करावी, अशा मागण्या केल्याचे एएमसीच्या डॉ. वीणा पंडित यांनी सांगितले.

या आंदोलनात पालिका रुग्णालयातील प्रशिक्षणार्थीच्या संघटनेचे काही प्रतिनिधी उपस्थित होते. बुलढाणा येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला सागर डोळे या प्रशिक्षणार्थीने डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली. आमच्यासोबतचे अनेक विद्यार्थी परदेशात नोकरी करणे पसंत करतात. मात्र मला  देशात राहून रुग्णांची सेवा करायची आहे. पण डॉक्टरांवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर खूप भीती वाटते. अशी भावना सागरने व्यक्त केली.

‘मार्ड’च्या डॉक्टरांची गरहजेरी

निवासी डॉक्टरांनी आयत्या वेळी शुक्रवारचा संप मागे घेतला होता. ज्या निवासी डॉक्टरांसाठी राज्यभरातील डॉक्टर निषेध नोंदविण्यासाठी आले होते, त्या आंदोलनात याच निवासी डॉक्टरांची संघटना मात्र गरहजर होती. हा संप मागे घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर धुळ्यातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे संप मागे घेताल्याचे ‘मार्ड’ संघटनेचे डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले.