News Flash

दहशतीखालील बंदरव्यापार, बकालीकरण आणि ‘कचराभूमी’

ब्रिटिशांनी भायखळ्यातील ५३ एकर जागेत १८६२ मध्ये हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारले.

प्रभागफेरीविभाग कार्यालय

जुन्या चाळी, अलीकडेच पुनर्विकासात उभे राहिलेले टॉवर आणि झोपडपट्टी असे या परिसराचे रूप. या विभागातील मुख्य आकर्षण म्हणजे वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग). ब्रिटिशांनी भायखळ्यातील ५३ एकर जागेत १८६२ मध्ये हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारले. ब्रिटिश काळात ते ‘क्वीन व्हिक्टोरिया गार्डन’ या नावाने ओळखले जात होते. दुर्मीळ वनस्पती आणि वृक्षांसाठी ते प्रसिद्ध आहे. आजघडीला तेथे २८६ प्रजातींचे ३,२१३ वृक्ष आणि ८५३ जातींच्या वनस्पती आहेत. त्यामुळेच वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राणीची बाग वरदान ठरली आहे. विविध प्रकारचे प्राणी येथे पाहावयास मिळत होते; परंतु काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची संख्या रोडावली आहे. पालिकेने सध्या राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून लवकरच ते पूर्ण होऊन देशी-विदेशी प्राण्यांचे दर्शन येथे घडणार आहे. केवळ मुंबईकरच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांच्या दृष्टीने राणीची बाग आकर्षण बनली आहे. मुंबईची वाट धरणारे बहुतेक जण या परिसरात असलेल्या मुंबई सेंट्रल एसटी आगारात पायउतार होतात. तर मुंबईतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी येथून एसटी बसगाडय़ा सोडण्यात येतात. त्यामुळे या आगाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईला जोडणाऱ्या सातरस्त्यावर आता लवकरच मोनो रेल्वे धावताना दिसणार आहे. मोनो रेल्वेमुळे सातरस्त्याहून वडाळा परिसरात जाण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. आर्थर रोड कारागृहही याच परिसराचा भाग; मात्र कारागृहाच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे आसपासच्या बैठय़ा चाळींच्या पुनर्विकासाला खीळ बसली होती, परंतु आता आसपासच्या परिसरात पुनर्विकासात इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील दारूखाना परिसर बंदराचा एक भाग. रोजगाराच्या निमित्ताने अनेक जण दारूखान्याच्या आश्रयाला राहिले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर अतिक्रमण करून झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. रेती बंदर परिसरात तर बांबूंच्या साह्य़ाने समुद्राच्या पाण्यात उभारलेल्या झोपडय़ांमध्ये अनेक रहिवासी राहत आहेत. तर काही भूखंडांवर समाजकंटकांनी कब्जा केला आहे. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या बंदर परिसरात झोपडपट्टय़ांमुळे बकाल रूप आले आहे. समाजकंटकांच्या कारवायांमुळे हा परिसर सतत दहशतीखालीच असतो. व्यापाराच्या दृष्टीने तेथील हे वातावरण अत्यंत घातक असून त्यात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.

अंतर्गत भाग :  दारूखाना, वीर जिजामाता उद्यान, भायखळा, घोडपदेव, वाडीबंदर, एकतानगर, अंजीरवाडी, ताडवाडी, मदनपुरा, न्यू नागपाडा, काझीपुरा, सिद्धार्थ नगर.

अनेकांच्या मतपेढय़ा

पालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत मिश्र लोकसंख्या आहे. मराठी आणि मुस्लीमबहुल वस्त्यांची संख्या येथे अधिक आहे. तर काही विभागांत दलित मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. अल्पसंख्यांक आणि दलित मतांच्या जोरावर काँग्रेसने या भागात भक्कम पाय रोवले होते. गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या दगडी चाळीनेही काही विभागात आपली मतपेढी जपली आहे. याच मतपेढीच्या जोरावर पालिकेच्या मागील निवडणुकांमध्ये येथील दोन प्रभागांत अखिल भारतीय सेनेचे उमेदवार विजयी होऊन पालिकेत दाखल झाले आहेत. तर आठपैकी दोन प्रभागांमध्ये शिवसेनेला यश मिळाले होते. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र ‘एआयएमआयएम’च्या उमेदवाराने काँग्रेसला धूळ चारली होती.

विभागातील समस्या

झोपडपट्टय़ांची डोकेदुखी

या विभाग कार्यालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी छोटय़ा झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. ‘राजाश्रय’ लाभल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करताना पालिकेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय काही ठिकाणी झोपडपट्टीवासीयांनी पथाऱ्या पसरून पदपथांवरच ठाण मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पदपथावरून झोपडय़ा हटविण्यासाठी पालिकेने अनेकदा कारवाई केली, पण काही दिवसांनी पुन्हा तेथे झोपडय़ा उभ्या राहत असल्याने पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडय़ा, झोपडपट्टीवासीयांची रस्त्यावरील वर्दळ यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तर काही वेळा अपघातही होत आहेत. एकूणच परिस्थितीत या झोपडय़ांमुळे डोकेदुखी वाढली आहेत.

बीआयटी चाळींचे त्रांगडे

माझगावच्या ताडवाडीतील बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न जवळपास १३-१४ वर्षे रखडला आहे. हळूहळू या चाळी धोकादायक बनू लागल्या आहेत. रखडलेल्या पुनर्विकासावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. आठ-नऊ वर्षांपूर्वी धोकादायक बनलेली एक चाळ तोडली आणि तेथेच बांधलेल्या संक्रमण शिबिरात रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु आता संक्रमण शिबिराची इमारतही धोकादायक बनण्याच्या बेतात आहे. अलीकडेच या चाळींपैकी पाच इमारती धोकादायक बनल्यामुळे त्याही रिकाम्या करण्यात आल्या. आठ वर्षांपूर्वी येथेच बांधलेल्या संक्रमण शिबिरात काही रहिवाशांची रवानगी करण्यात आली. तर उर्वरित साधारण २२० रहिवाशांची माहुलला पाठवणी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ या इमारती पाडून टाकण्यात आल्या. मात्र त्यानंतर पुनर्विकासाला वेग आलेला नाही. ताडवाडीमध्ये लहानाचे मोठे झालेले तरुण विविध राजकीय पक्षांमध्ये नेते म्हणून मिरवीत आहेत, पण त्यांपैकी एकाही नेत्याला नेटाने हा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही.

बजबजपुरी

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत असलेल्या दारूखाना परिसराला बजबजपुरीचे रूप आले आहे. समाजकंटकांचा वावर, झोपडय़ांचे साम्राज्य, पोर्ट ट्रस्टच्या भूखंडावर झालेले अतिक्रमण, उभ्या राहिलेल्या झोपडपट्टय़ा, अवजड वाहनांच्या सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दैना, मलवाहिन्या-सांडपाणी वाहिन्यांच्या जाळ्याचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दारूखाना परिसराची बजबजपुरी झाली आहे. झोपडपट्टय़ांमधील पाणी थेट समुद्रात सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रात मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. दारूखाना परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेला मुंबई पोर्ट ट्रस्टकडून परवानगी घ्यावी लागते. अनेकदा वेळेत परवानगी न मिळाल्याने नागरी सुविधांची कामे रखडतात.

पाणीमाफियांचे राज्य

दारूखाना आणि अन्य काही परिसरात पाणी माफियांचे साम्राज्य आहे. पालिकेची जलवाहिनी फोडून वा दूरवरच्या जलवाहिनीला छिद्र पाडून टँकरमध्ये पाणी भरून या भागात आणले जाते. झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना दामदुप्पट दराने हे पाणी विकले जात आहे. दारूखानाच नव्हे तर अन्य ठिकाणच्या झोपडपट्टय़ांमध्येही पुरेसे पाणी नसल्याने झोपडपट्टीवासीयांना पैसे मोजून पाणी माफियांकडून पाणी घ्यावे लागत आहे. म्हणूनच पाणी माफियांचे फावत असून त्यांच्या दहशतीपुढे पालिका अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागत आहे. परिणामी, पालिकेने शुद्ध केलेल्या पाण्याची सर्रास येथे विक्री होत आहे.

बेकायदा बांधकामे

‘बी’ विभागाप्रमाणेच ‘ई’ विभागातही अनधिकृत बांधकामे पालिकेसाठी डोकेदुखी बनली आहे. अनेक इमारतींवर बेकायदा मजले चढविण्यात आले आहेत. तसेच दुमजली ते तीन मजली झोपडय़ांचीही संख्या वाढत आहे. पण या बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाईचे धाडस पालिकेने दाखविलेले नाही.

कचऱ्याचे साम्राज्य

झोपडपट्टय़ांचा परिसरात नियमितपणे साफसफाई होताना दिसत नाही. झोपडपट्टीवासीय आजूबाजूला कचरा भिरकावत असल्यामुळे परिसरात दरुगधी आणि अनारोग्याची समस्या तीव्र झाली आहे. कचरा आणि दरुगधी यामुळे काही ठिकाणी उकिरडा झाला आहे.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदपथ व्यापले

या परिसरात अनेक ठिकाणी पदपथ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापलेले आहेत. काही ठिकाणी सकाळपासून, तर काही ठिकाणी संध्याकाळी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा सुरू होतात. त्यामुळे अडणाऱ्या पदपथावरून चालणे पादचाऱ्यांना अशक्य बनले आहे. खाद्यपदार्थ गाडीचालक रात्री उशिरा कचरा तेथेच टाकून निघून जातात. शिल्लक राहिलेल्या खरकटय़ामुळे तेथे घुशी आणि भटक्या कुत्रांचा वावर वाढत आहे.

गेल्या काही काळात येथील मुस्लीमबहुल विभागात ‘एएमआयएम’ची ताकद वाढली असून त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसला हा गड राखताना ‘एएमआयएम’शी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

माझगावमधील ताडवाडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न कळीचा बनला आहे. आसपासच्या विभागात जुन्या इमारतींच्या जागी टॉवर उभे राहत आहेत. पण ताडवाडीमधील बीआयटी चाळवासीय मात्र पुनर्विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. या विभागाला पाणीपुरवठय़ाचा तसा प्रश्न भेडसावत नाही; मात्र स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. चाळींमधून सर्रास रस्त्यावरच कचरा फेकला जातो. सकाळच्या साफसफाईनंतर दिवसभरात पुन्हा रस्ते कचऱ्याने भरतात. नागरिकांनीही सहकार्य करून विभागात स्वच्छता राखण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.

अरुण पाटील, रहिवासी माझगाव

या विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील पूर्वेकडील परिसरात नियमितपणे साफसफाई होते. मात्र पश्चिमेकडील परिसर अस्वच्छ असून तेथील साफसफाईकडे कोणाचेच लक्ष नाही. या विभागाला पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी सोडत पद्धतीने गिरणी कामगारांना घरे देण्यात आलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये पाण्याची प्रचंड चणचण भासत होती. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकोप्याने हा प्रश्न सोडवून येथील रहिवाशांना दिलासा दिला आहे.

दिलीप सांगळे, समाजसेवक

या परिसरातील अनेक जुन्या चाळी पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. विकासकांनी अनेक चाळी घेतल्या आहेत. परंतु त्यांच्या पुनर्विकासाला मात्र चालना मिळू शकलेली नाही. मदनपुरा, माझगाव, सातरस्ता, आग्रीपाडा, भायखळा आदी परिसरातील भूखंडावर पालिकेच्या बैठय़ा चाळी उभ्या आहेत; मात्र या चाळींवर आता अनधिकृतपणे मजले चढविण्यात आले आहेत. त्यामुळे बहुमजली बनलेली बैठी घरे घोकादायक बनू लागली असून  त्याकडे पालिकेचे लक्ष नाही. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अल्ताफ पटेल, भूमिपुत्र सोशल मूव्हमेन्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:27 am

Web Title: mumbai e ward politics
Next Stories
1 फॉच्र्युनर, मर्सिडीजची अवघ्या दीड कोटींत विक्री!
2 पवारांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री बारामतीमध्ये
3 जाती-धर्माच्या आधारे घर नाकारण्यास विकासकांना मुभा!
Just Now!
X