देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत वाहनांच्या ट्रॅफिकची समस्या ही शहराच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र, मुंबईतील एका पिझ्झा सेंटरने वाहतुकीच्या समस्येवर नामी उतारा शोधून काढला आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने केवळ युद्धभूमीपुरते मर्यादित अस्तित्व असणाऱ्या मानवविरहीत (ड्रोन) विमानांच्या सहायाने पिझ्झा घरपोच करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. दक्षिण मुंबईतील लोअर परळ भागातील फ्रॅन्सिस्को पिझ्झा सेंटरमधून पिझ्झा घेऊन उडालेल्या ड्रोन विमानाला वरळी भागातील ठिकाणावर पिझ्झा घरपोच करण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी जागतिक ई-व्यापार क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अॅमेझॉनने  ड्रोन विमानांच्या अशाप्रकारे वापराचा यशस्वी प्रयत्न केला होता. मुंबईत ११मे रोजी या ड्रोन विमानाने लोअर परळ भागापासून तब्बल १.५ किलोमीटर अंतरावरील इच्छित स्थळी पिझ्झा घरपोच करण्यात यश मिळविल्याची माहिती फ्रॅन्सिस्को पिझ्झारिआचे मुख्य निरीक्षक मिखेल रजानी यांनी दिली. आमचा हा पहिलाच प्रयोग असला तरी येणाऱ्या काळात ड्रोन विमानांचा वापर सहजपणे करता येऊ शकतो हे सिद्ध झाले असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.