राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे ८२ कोटींची लाच मिळाल्याच्या कथित आरोपाप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपास करीत असलेल्या विशेष पथकाने भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या दोघा कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस बोलावून त्यांची चौकशी केली. आतापर्यंतच्या या चौकशीत हाती आलेल्या सकृद्दर्शनी पुराव्यांवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची तयारीही करण्यात आल्याची माहितीही सूत्रांचे दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न, आज होत असलेला मोदी यांचा बारामती दौरा यामागे राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांमागील चौकशांचे शुक्लकाष्ट दूर करण्याचा हेतू असल्याचे बोलले जाते. असे असले तरी राष्ट्रवादी मंत्र्यांविरोधातील चौकशांना अंमलबजावणी महासंचालनालय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेग दिला असल्याचेच स्पष्ट होत आहे.
आम आदमी पार्टीने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण ११ आरोपांप्रकरणी विशेष पथक चौकशी करीत असून, त्यात भुजबळ तसेच त्यांचे कुटुंबीय आणि मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांच्या नावे असलेल्या कंपन्यांमार्फत ८२ कोटींची लाच स्वीकारली गेली, असा आरोप आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी येथील कार्यालयात सध्या ही चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी महासंचालनालय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संयुक्तपणे ही चौकशी करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून चौकशीने वेग घेतला असून, एमईटीचे कर्मचारी व एका डमी कंपनीचे संचालक असलेल्या तन्वीर शेख तसेच लेखापाल संजय जोशी यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.
महाराष्ट्र सदन बांधणीत भुजबळांच्या कुटुंबीयांशी संबंधित ओरिजन कंपनीला साडेतीन कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. या कंपनीवर तन्वीर शेख तसेच त्याची पत्नी आणि संजय जोशी हे संचालक आहेत. या कंपनीने आयडीन इन्फ्रास्ट्रक्चरला कंत्राट दिले होते. या कंपनीवर भुजबळांच्या सुना संचालक आहेत. याशिवाय या प्रकरणात नीश इन्फ्रास्ट्रक्चरलाही तब्बल साडेतेरा कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. या कंपनीवर समीर भुजबळ हे संचालक आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील एका बंद खोलीत महाराष्ट्र सदनप्रकरणी सापडलेल्या फायलींचीही सध्या पडताळणी सुरू आहे. या फायली प्रामुख्याने महाराष्ट्र सदन बांधणीच्या वेळच्या असून त्यात मोजमापे तसेच इतर बांधकामांविषयक तपशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतल्यानंतर निवासी आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ही कागदपत्रे तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यानंतर ती वांद्रे येथील कार्यालयात ठेवण्यात आल्याचे या प्रकरणी सांगितले जात आहे. मात्र विशेष पथकाकडून या फायलींशी संबंधित अभियंत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
*महाराष्ट्र सदन बांधणीत भुजबळांच्या कुटुंबीयांशी संबंधित ओरिजन कंपनीला साडेतीन कोटी दिल्याचा आरोप आहे.
*या कंपनीवर तन्वीर शेख तसेच त्याची पत्नी आणि
संजय जोशी हे संचालक आहेत. या कंपनीने आयडीन इन्फ्रास्ट्रक्चरला कंत्राट दिले होते. या कंपनीवर भुजबळांच्या सुना संचालक आहेत.
*याशिवाय या प्रकरणात नीश इन्फ्रास्ट्रक्चरलाही तब्बल साडेतेरा कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. या कंपनीवर समीर भुजबळ हे संचालक आहेत.