19 January 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र.. निकालाची चर्चा!

सर्व पक्षांच्या कार्यालयांमध्ये टीव्हीवर निकाल पाहण्यासाठी कायेकर्ते आणि रहिवाशांनी गर्दी केली होती.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या मुंबई येथील कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. त्यात सर्वसामान्य मुंबईकरही सहभागी झाले.

राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांप्रमाणे सर्वसामान्य मुंबईकरांतही उत्साह

मुंबई : झाडून प्रत्येक एक्झिट पोलने मोदी सरकारच्या पारडय़ात आपले अंदाज टाकले असले तरी मतमोजणी केंद्रांवर पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबरच मुंबईच्या गल्लोगल्लीत गुरूवारी लोकसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित निकालाचीच चर्चा होती. एरवी विनोद, मिम्स, टिकटॉक व्हिडीओ, डॉक्टरांच्या नावावर खपवलेले संदेश ‘फॉरवर्ड’ करण्यापुरतेच मोबाईलचा वापर करणारे मुंबईकर बातम्या पुरविणाऱ्या ‘अ‍ॅप’वरून निकालाचे ‘अपडेट’ मिळवित होते.

मुंबईतील सहा मतदार संघांसाठी भरभरून मतदान झाले होते. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई सहा मतदार संघात भर उन्हात उभे राहून मुंबईकरांनी मतदान केले होते. त्यातच यंदा निवडणुकांनी वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याने निकालांबाबत असलेली उत्सुकता शुक्रवारी दिसून आली. मुंबईत अनेक ठिकाणी मोठय़ा स्क्रीनवर निकालांचे अपडेट दिले जात होते. काही रेल्वे स्थानकांवरील मोठय़ा स्क्रीनवर निकाल पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.

सर्व पक्षांच्या कार्यालयांमध्ये टीव्हीवर निकाल पाहण्यासाठी कायेकर्ते आणि रहिवाशांनी गर्दी केली होती. पण नेहमीप्रमाणे ठरलेली लोकल पकडून मुंबईकर कामाला निघालेले असले तरी ट्रेनमध्ये, बसमध्ये निकालाचीच चर्चा होती. एरव्ही क्रिकेटच्या सामन्यांचे अपडेट घेणारे मुंबईकर आज ट्रेनमध्ये उभ्याउभ्याही मोबाईलवर निकालाचे अपडेट घेत होते. तर मोबाईलवर टीव्ही चॅनेलवर लाईव्ह निकाल पाहत होते. यावेळच्या निवडणूकीतही मोदींच्या बाजूने आणि मोदींच्या विरोधात असे स्पष्ट दोन तटच निर्माण झाले होते. त्यामुळे चर्चेचा सूरही तसाच होता.

नाक्यानाक्यांवर थांबलेले रिक्षावाले, टॅक्सीवाले, मालकाची गाडी लावून उभे असलेले खासगी वाहनचालक, दुपारी लंचच्या वेळेस पाय मोकळे करण्याकरिता कार्यालयाबाहेर पडलेल्या नोकदारांमध्येही निकालाचीच चर्चा होती. जो तो आपापल्या माहितीनुसार, वकुबानुसार निकालांवर आपले मत व्यक्त करत होते.

उत्तर भारतीय वाहनचालकांच्या चर्चेत तर पार बिहार, उत्तर प्रदेश निकालांची चर्चा होती. ही मोदी लाटच आहे, तर कोणी म्हणत होते की मोदींच्या समोर कोणी सक्षम नेताच नाही, तर कोणी म्हणत होते आता २०२४ मध्ये पण भाजपच येणार अशा सगळ्या चर्चा आज जागोजागी कानांवर पडत होत्या.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

निकालाच्या पाश्र्वभूमीवर कुठेही काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.  निकालानंतर काही राजकीय पक्ष गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा घटना टाळण्यासाठी शहरात सर्वच ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त लावला होता. पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे, शिवाजी नगर, सिद्धार्थ कॉलनी, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी पार्क साईट अशा काही महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या होत्या.

तीन ठिकाणी मतमोजणी

मुंबईतील सहा मतदारसंघाची मतमोजणी एकूण तीन ठिकाणी झाली. त्यापैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुबंई या दोन मतदारसंघांची मतमोजणी शिवडी येथील  न्यू शिवडी वेअर हाऊस येथे झाली तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबई या मतदारसंघाची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडवर सुरू होती. तर ईशान्य मुंबईची मतमोजणी विक्रोळीत गोदरेज कॉलनीत पार पडली. या तीनही परिसरातील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथील वाहतूक वळवण्यात आली होती.

रस्त्यांवर शुकशुकाट

एकतर ऊन आणि त्यात निकालाचा दिवस यामुळे गुरूवारी बहुतेक ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट होता. पूर्व उपनगरातील घाटकोपर, कंजूरमार्ग, विक्रोळी, भांडुप, चेंबूर, गोवंडी आणि कुर्ला परिसरात नेहमीच मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी असते. मात्र गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल असल्याने सकाळपासून येथील रस्त्यांवर वाहनांची तुरळक गर्दी पहायला मिळाली.

फटाके वाजवून जल्लोष

दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे विजयाच्या उंबरटय़ावर असल्याचे समोर येताच चेंबूरमधील त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.  तर देवनार आणि सुभाष नगर परिसरातील भाजप कार्यालयामध्ये मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांंनी जल्लोष केला. घाटकोपरमध्ये देखील मनोज कोटक यांना आघाडी मिळत असल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांंनी देखील परिसरात मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

First Published on May 24, 2019 4:50 am

Web Title: mumbai election result 2019 mumbai election news lok sabha election result 2019
Next Stories
1 फेरीगणिक मताधिक्यामुळे जल्लोषाला उधाण
2 समाजमाध्यमांवर विनोद, उपरोधाला उधाण
3  ‘मराठी माणूस भडकला..’
Just Now!
X