दोन वर्षांत पुरातत्त्व विभागाची परवानगी नाही

मुंबई : शिवडी ते एलिफंटा या समुद्रातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी ‘रोप वे’ प्रकल्पाचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीविना दोन वर्षांपासून अजून सुरूच झालेले नाही. जानेवारी २०१८ मध्ये या समुद्रातील आठ किमी लांबीच्या ‘रोप वे’ची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र अजूनही या प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

शिवडी येथील हाजी बंदर ते एलिफंटा बेटापर्यंत हा ‘रोप वे’ प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये ५० ते १५० मीटर उंचीच्या आठ ते ११ खांबांचा वापर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आला तर जगातील सर्वात लांब असा समुद्रावरील ‘रोप वे’ ठरू शकतो. या प्रकल्पाचा खर्च सुमारे ६०० कोटी रुपये आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या रोप वेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्याचे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाबाबत अजूनही पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढच्या कामास अद्याप सुरुवात झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

एलिफंटा बेटावर साधारण सातव्या शतकातील शैव लेणी असून, त्या ठिकाणी बांधकाम करण्यास पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार अनेक बंधने आहेत. त्यासंदर्भात अजूनही तिढा सुटलेला नाही. सध्या गेट वे ऑफ इंडिया येथून लाँचने एलिफंटा बेटावर जावे लागते. एका आकडेवारीनुसार सुमारे सात लाख पर्यटक दरवर्षी एलिफंटाला भेट देतात. रोप वेचा प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ १४ मिनिटांत एलिफंटा गाठणे शक्य होईल. तसेच रोप वेच्या एका ट्रॉलीमधून एकावेळी ३० पर्यटक जाऊ शकतात. एका अंदाजानुसार २० हजार पर्यटक या सुविधेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार डिसेंबर २०२० मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होण्याचे उद्दिष्ट होते. मात्र अद्यापही परवानग्याच मिळू न शकल्यामुळे प्रकल्पाचे कामच सुरू होऊ शकले नाही. यासाठी दोन जागतिक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. तसेच जानेवारी २०१८ मध्ये पर्यावरण परवानग्यांसाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही.