‘अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे शनिवारी समस्त मुंबईकरांच्या ओठावर ‘अवचित झाला शिडकावा पावसाचा’असे शब्द आले. सध्या सुरु असलेल्या फाल्गुन महिन्यात दिवसभर अंगाची लाही लाही आणि रात्री थंडी असा अनुभव मुंबईकर घेत असतानाच शनिवारी ऐन फाल्गुनात ‘घन निळा बरसला’..!
फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईकरांना घामाघुम करणाऱ्या निसर्गाने आपले लहरीपण पुन्हा एकदा सिद्ध केले. गेल्या दोन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी झाली आणि रात्रीच्या तापमानातही घट झाल्याने गुलाबी थंडी पुन्हा सुरु झाली असे वाटत होते. मात्र शनिवारची सकाळ ‘उगवला नाही सूर्य पूर्वेचा’ अशा स्वरुपात झाली. सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. वातावरणातही बऱ्यापैकी गारवा जाणवत होता. ‘गार गार वारा अंगावरी शहारा’ अशी अवस्था मुंबईकरांची झाली. ‘नभ मेघांनी आक्रमिले होते’ आणि कोणत्याही क्षणी ‘घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ असे दृश्य सर्वत्र होते.
वरुणराजाने सकाळपासून तयार केलेल्या नेपथ्याच्या पाश्र्वभूमीवर दुपारी एक-दीड नंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात झाली. दादर, चर्चगेट, नरिमन पॉइंट परिसरात तसेच उपनगरातही पावसाचा शिडकावा सुरु झाला. दहा ते पंधरा मिनिटे हा खेळ सुरु होता. विश्रातीनंतर संध्याकाळी साडेचारनंतर मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा वरुणराजाने पावसाचा खेळ मांडला.
अचानक झालेल्या या पावसाने मुंबईचा पूर्ण ‘मूड’ पालटला. मरिन ड्राईव्ह, गिरगाव, वरळी येथील चौपाटय़ांवर आबालवृद्धांनी गर्दी केली. चहाचा घुटका घेण्यासाठी आणि गरम गरम वडापाव व भजी खाण्यासाठी अनेकांची पावले रस्ते आणि पदपथावरील टपऱ्यांकडे वळली. संध्याकाळी उशिरापर्यंत वातावरण हे असे कुंद आणि धुंद  होते. दुपारी चार वाजेपर्यंत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ०.३ आणि ०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
दरम्यान ‘अवचित आलेला हा पाऊस’ ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा परिणाम आहे. सर्वसाधारणपणे या सुमारास पश्चिमेकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याचा परिणाम उत्तर भारत, दिल्ली येथे जाणवतो. कधी कधी या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे आणखी ‘लो प्रेशर’ तयार होते. यावेळी हे ‘लो प्रेशर’ पूर्वेकडे आणि कच्छच्या दिशेकडे सरकल्याने मुंबई आणि परिसर, उत्तर कोकण, सौराष्ट्र व अन्य ठिकाणी  हा पाऊस झाला. पुढील २४ ते ४८ तास ही परिस्थिती अशीच राहणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले.

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुढील २४ तासात पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव येथेही हलका पाऊस पडण्याची तसेच ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

पावसाचे कारण काय?
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वारे वाहात आहेत. ते एकमेकांना भिडत असल्याने पाऊस पडत आहे. महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांबरोबरच गुजरातमध्ये कच्छ-सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे.

आणखी किती दिवस पडणार?
सध्या सुरू असलेला पाऊस सोमवापर्यंत (२ मार्च) कायम राहील. तो रविवारी व सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पडेल. यापैकी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.

आंबा, द्राक्ष, ज्वारी व हरभरा धोक्यात
पावसाचा विपरीत परिणाम आंब्यापासून हरभरा, ज्वारी ही पिके तसेच, द्राक्षावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फ्लूजन्य वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.