कळवा-साष्टी केंद्रात बिघाड; मध्यरात्रीनंतर टप्प्याटप्याने विद्युतपुरवठा पूर्ववत
कळवा-साष्टी येथील वीज संग्रही केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गायब झाल्यामुळे अनेक ठिकाणचे रहिवासी मध्यरात्री असह्य उकाडय़ाने त्रस्त झाले होते. मात्र तब्बल ३५ मिनिटांनी विद्युतपुरवठा पूर्ववत झाला आणि मुंबईकरांची उकाडय़ातून सुटका झाली.
टाटा पॉवर कंपनीच्या कळवा-साष्टी येथील वीज संग्रही केंद्रामध्ये गुरुवारी मध्यरात्री १२.१० च्या सुमारास मुंबईमधील काही भागातील विद्युतपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे वरळी, लालबाग, नायगाव, परळ, दादर, धारावी, शिवडी, वडाळा, माटुंगा, माहीम, प्रभादेवी, वांद्रे, सांताक्रूज, चेंबूर आदी भागातील नागरिकांना त्याचा फटका बसला. काही भागातील पदपथांवरील दिवे बंद झाल्याने रस्त्यांवरही अंधाराचे साम्राज्य पसरले होते. विद्युतपुरवठा खंडीत झाल्यामुळे पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आणि नागरिक उकाडय़ाने हैराण झाले. परिणामी काही त्रस्त नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. अनेकांनी बेस्ट उपक्रमाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु हेल्पलाईनवर संपर्क होत नसल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले.

वीज संग्रही केंद्रात तांत्रिक बिघाड
अधिक दाबाने वीज घेऊन ती कमी दाबाने ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम वीज संग्रही केंद्र करते. कळवा-साष्टी येथील वीज संग्रही केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने धारावी येथील संग्रही केंद्रावर अधिक दाबाने वीज स्वीकारली गेली. त्यामुळे अतिरिक्त ताण पडून धारावी संग्रही केंद्र बंद पडले आणि मुंबईतील काही भागातील विद्युतपुरवठा खंडीत झाला. मात्र कळवा-साष्टी वीज संग्रही केंद्रात १२.४१ वाजता, तर धारावीच्या केंद्रात १२.५० च्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि मुंबईतील विद्युतपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाल्याची माहिती टाटा पॉवर कंपनीकडून देण्यात आली.