News Flash

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

एनसीबीकडून सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपास सुरु असून आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या संबंधितांची नावं समोर आली आहेत. अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अजून एक अटक करण्यात आली असून मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीकडून सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून सोमवारी त्याची चौकशी करण्यात आली होती.

जयशंकर तिवारी यांना ‘मुच्छड पानवाला’ नावाने ओळखलं जातं. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक आहेत. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचं नाव समोर आलं होतं. खारमध्ये राहणारा हा ब्रिटीश नागरिक आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

एनसीबीने वांद्रे येथून करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

‘मुच्छड पानवाला’ हा मुंबई आणि देशातील प्रसिद्ध पानवाल्यांपैकी एक आहे. १९७० पासून केम्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाल्याचं दुकान असून दरवर्षी त्याच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मुच्छड पानवाला महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. विशेष म्हणजे २०१६ मध्ये त्याने ग्राहकांकडून ऑनलाइन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटदेखील सुरु केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 7:26 am

Web Title: mumbai famous muchhad paanwala has been arrested by ncb following questioning in a drug case sgy 87
Next Stories
1 अकरावीच्या प्रथम प्राधान्य फेरीसाठी सव्वा लाख जागा
2 ‘टाटाच्या खारघर केंद्रातील विषाणू धोकादायक नाही’
3 बेस्टमध्ये पाच वर्षांत ३० टक्के इलेक्ट्रिक बस
Just Now!
X