31 May 2020

News Flash

बाजारगप्पा : तरुणाईची ‘फॅशन स्ट्रीट’

शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या सात ते आठ मिनिटांवर वसलेले फॅशन स्ट्रीटचे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे

कपडय़ांबरोबरच येथे चपला, शूज, दागिने अशा अन्य फॅशनच्या गोष्टींचीही रेलचेल असते.

मूळ किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देणारे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’ किंवा तरुणांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘एफएस’. मुंबईतील प्रत्येक बाजाराचे एक खास वैशिष्टय़  आहे. ससून डॉकवर चालणारी माशांची बोली, कुलाबा मार्केटमध्ये मिळणारे नव्या धाटणीचे दागिने, तांबा-काटा मार्केटमध्ये कमी होत जाणारा खऱ्या तांब्या-पितळेच्या वस्तू. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या सात ते आठ मिनिटांवर वसलेले फॅशन स्ट्रीटचे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे.

बॉम्बे जिमखान्याच्या समोरील महात्मा गांधी मार्गावरील सुमारे १ किलोमीटर अंतरावर विविध फॅशनचे कपडे पाहावयास मिळतात. सध्या या बाजारात  ३८५हून अधिक दुकाने वसलेली आहेत. या दुकानांमध्ये जीन्स, टी-शर्टचे नवनवीन प्रकार, कुडते, स्कर्ट, शॉर्ट्स या सर्व प्रकारांतील वेगवेगळ्या धाटणीचे कपडे सहज उपलब्ध होतात. मोठमोठय़ा ब्रॅण्डच्या नावाची वा लोगोची नक्कल करून लावलेल्या लेबलचे कपडे मिळण्याचे दक्षिण मुंबईतील ठिकाण म्हणूनही या बाजाराकडे पाहिले जाते. मुंबईत ज्या कपडय़ांची ट्रेंड सुरू होते त्या प्रकारातील कपडे या बाजारात अगदी कमी किमतीत मिळतात. रस्त्यावरील फूटपाथवर लागून या दुकानांची रचना आहे. प्रत्येक दुकानात विशिष्ट प्रकारचेच कपडे विकले जातात. म्हणजे, शर्टच्या दुकानात केवळ शर्टच मिळतात तर फक्त जीन्स पँटची विक्री करणारी स्वतंत्र दुकाने येथे आहेत. त्यामुळे ग्राहकालाही एकाच दुकानात विविधता मिळते.

कपडय़ांबरोबरच येथे चपला, शूज, दागिने अशा अन्य फॅशनच्या गोष्टींचीही रेलचेल असते. त्यातही शनिवारी व रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तर येथे मोठी गर्दी होते. सकाळी साधारण नऊ वाजता बाजार बसायला सुरुवात होते. हा बाजार रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असतो. त्यानंतरही पुढील एक ते दोन तास काही दुकाने सुरू असतात. दुपारी १२ ते सायंकाळी ४ ही वेळ खरेदी करण्यासाठी योग्य आहे. त्यानंतर मात्र बाजारांमध्ये गर्दी वाढायला लागते.

पाश्चात्त्य कपडय़ांसाठी हा बाजार ओळखला जातोच; ‘घासाघीस’ हे येथील सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. जर तुम्ही ‘बार्गेन एक्स्पर्ट’ असाल तर सुरुवातीला १००० रुपये सांगितलेली वस्तू व कपडे तुम्ही येथून अगदी ४०० रुपयांतही घेऊन जाऊ शकता. सर्वसाधारणपणे येथे एका टी-शर्टमागे ५०० ते ६०० रुपये सांगितले जातात. तुमचे घासाघीस करण्याचे कौशल्य चांगले असेल तर मात्र तुम्हाला हाच टी-शर्ट २०० ते २५० रुपयांपर्यंत सहज मिळू शकतो. त्यामुळे अनेकदा ग्राहक एखाद्या वस्तूची किंमत थेट अर्ध्यापर्यंत आणून ठेवतो. नव्या ग्राहकांना हे अजब वाटू शकण्याची शक्यता असली तरी हीच या बाजाराची परंपरा आहे, असे म्हणता येऊ शकते. जून-जुलै व डिसेंबर या काळात ‘एफएस’वर तरुणाईची तोबा गर्दी होते. या बाजाराचा मुख्य ग्राहक महाविद्यालयीन तरुणवर्ग असल्याने महाविद्यालये सुरू होण्याच्या काळात येथे खरेदी करणे म्हणजे एक दिव्यच ठरते.

जीन्स या कापडाच्या शर्टची फॅशन पुन्हा बाजारात सुरू होताना दिसत आहे. त्यातही आर्मीच्या गणवेशाच्या टी-शर्टची सध्या बाजारात चलती आहे. याशिवाय शर्ट/ टी-शर्टचे विविध प्रकार बाजारात विकले जात आहे. सध्या दिवाळीसाठी महाविद्यालयांना सुट्टी व त्यानंतर परीक्षा असल्याने सध्या हा बाजार कमी गर्दी दिसून येते. येथे येणारा बहुतांश माल उल्हासनगर, दिल्ली, सुरत येथून आणला जातो. या बाजाराने तरुणांना आवडते कपडे परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्याबरोबर या बाजारातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या एका दुकानात दोन ते तीन जण काम करतात. ही मुले उत्तर प्रदेश, झारखंड या भागांतून आलेली आहेत. या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न घसघशीत नसले तरी, मुंबईत टिकून राहण्याची क्षमता हा बाजार या मंडळींना नक्कीच देतो.

अलीकडे मॉलसारख्या ठिकाणी सर्व ब्रॅण्डचे कपडे एकाच छताखाली उपलब्ध होतात. तेथील चकचकीतपणा, रोषणाई आणि वातावरणातील सैलपणा तरुणाईला मॉलकडे आकर्षित करतो. ‘फॅशन स्ट्रीट’वर यापैकी काहीच नाही, असं म्हणता येईल. पण तरीही तरुणवर्गाचं या बाजाराबद्दलचं आकर्षण अजिबात कमी झालेलं नाही. ‘एफएस’ अजूनही ‘फॅशन’मध्ये आहे, याचंच हे द्योतक.

मीनल गांगुर्डे – meenal.gangurde8@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 1:44 am

Web Title: mumbai fashion street best place for shopping at cheapest rates
Next Stories
1 तपासचक्र : पारंपरिक तपास पद्धतीने खुनी जाळ्यात
2 ड्रामेबाजीचे ‘पूल’ बांधण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही- अरविंद सावंत
3 फडणवीस सरकारमुळे राज्याचा विकास खुंटला-धनंजय मुंडे
Just Now!
X