News Flash

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार; आझाद मैदानातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद आंदोलन

शेतकऱ्यांचा विरोध असणारे हे तिन्ही कायदे केंद्राने परत घेण्याची मागणी

(फोटो सौजन्य : ट्विटर आणि पीटीआयवरुन साभार)

शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक रविवारी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज सकाळपासूनच या मोर्चातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवण्यास सुरुवात केलीय. या मोर्चामधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मात्र या मोर्चाला आता मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटवरील दुकानादारांनाही पाठिंबा दर्शवत आज दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत रविवारी संध्याकाळी दाखल झाले. शनिवारी हा मोर्चा वाहनांमधून नाशिकहून मार्गस्थ झाला होता. इगतपुरीत मुक्काम के ल्यावर रविवारी सकाळी घाटनादेवी येथून कसाऱ्यापर्यंत आंदोलक पायी आले. सुमारे तीन तासात घाट उतरून खाली आल्यावर वाहनांमधून मोर्चेकरी मुंबईकडे रवाना झाले. ठाणे शहर व मुंबईत मोर्चाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी वाहनांमधून मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाले. हे मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाल्यापासून त्यांना सर्वच स्तरांमधून पाठिंबा दिला जात आहे.

आणखी वाचा- दादरच्या गुरुद्वाराकडून शेतकरी मोर्चासाठी २५ हजार पुलाव पॅकेट, डाळी, केळीची व्यवस्था

विशेष म्हणजे आझाद मैदानालाच लागून असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील जवळजवळ सर्वच दुकानदारांनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज दुकानं बंद ठेवण्याचे वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. आझाद मैदानला लागू असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं आज बंद ठेऊन मोर्चातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. आम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच लेकरं असून शेतकऱ्यांचा विरोध असणारे हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे फॅशन स्ट्रीटवरील दुकानादार सांगतात. केवळ भूमिका घेत पाठिंबा न देता तो कृतीमधून दर्शवण्यासाठी आज सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील दुकानदारांनी घेतला आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन -‘स्वाभिमानी’च्या सांगली- कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात

पालिकेकडून मोर्चेकऱ्यांना मदत

मोर्चासाठी रविवारी संध्याकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली. परिणामी, आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मोर्चा लक्षात घेऊन पालिकेने स्वच्छतेसाठी सफाई कामगार, पिण्यासाठी पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटपही सुरू केले. मोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेने आझाद मैदान परिसरात वैद्यकीय शिबिराची  व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास करोना चाचणीही करण्यात येत आहे, असे ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त आणि वाहतुकीतील बदल

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने सोमवारी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानाभोवती सुमारे शंभर अधिकारी आणि ५०० अंमलदारांचा फौजफाटा तैनात केला आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकडय़ा या बंदोबस्तात असतील. ड्रोनद्वारे या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:53 pm

Web Title: mumbai fashion street shopkeepers closed their shops for a day in support of farmers protest scsg 91
Next Stories
1 दादरच्या गुरुद्वाराकडून शेतकरी मोर्चासाठी २५ हजार पुलाव पॅकेट, डाळी आणि फळांची व्यवस्था
2 शेजारी राहणाऱ्या मुलीच्या पोटातील बाळाचा पिता ‘तो’ नाही सिद्ध झालं आणि…
3 “जय श्रीराम म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येणार नाही, हा काही राजकीय शब्द नाही”
Just Now!
X