अचानक गडद झालेला काळोख आणि टपटप कोसळून दोन-पाच मिनिटांत गायब होणारी सर.. संततधार पावसाची सवय असलेल्या मुंबईकरांना सध्या या अनोळखी पावसाचा अनुभव येत आहे. राजस्थानच्या वाळवंटावर निर्माण झालेल्या अपवादात्मक अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची ही किमया असून वेगवान वारे आणि अचानक कोसळणारी सर हा अनुभव गुरुवापर्यंत कायम राहील. त्यानंतरही मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस राहणार असून मराठवाडय़ासह महाराष्ट्रातील पावसाची ओढ संपण्याची चिन्हे आहेत.
कोकणात मुख्यत्वे अरबी समुद्रात किनाऱ्यानजीक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पाऊस पडतो. अतिपावसाच्या प्रदेशात येत असलेल्या कोकणात पावसाची संततधार लागलेली असते. मात्र सध्या आभाळ भरलेले असतानाही केवळ दोन ते तीन मिनिटांसाठी वेगाने सरी येत आहेत. यासाठी कारणीभूत ठरली आहे ती राजस्थानवर निर्माण झालेली वातावरणातील अपवादात्मक स्थिती. सहसा समुद्रावर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले की पाण्याच्या वाफेचा आधार घेत त्याचे वादळात रूपांतर होते. ही वादळे जमिनीवर आली की बाष्पाचा पुरवठा बंद झाल्याने त्यांची तीव्रता कमी होऊन ती निवतात. मात्र सध्या राजस्थानवरील कमी दाबाचे क्षेत्र अतितीव्र क्षेत्रात रूपांतरित होऊन वादळासारखा प्रभाव निर्माण करत आहेत. मान्सूनसोबत आलेल्या प्रचंड बाष्पाची सोबत मिळाल्याने राजस्थानवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही वादळाच्या पूर्वीची स्थिती असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ढग वेगाने तिथे जमा होत असून त्यामुळेच गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ या भागांत प्रचंड पाऊस येत आहे. या परिसराकडे ओढल्या जात असलेल्या ढगांमुळे सध्या मुंबई व परिसरात काही मिनिटांच्या वेगवान सरी येत आहेत, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याचाच परिणामस्वरूप किनाऱ्यावर वेगाने वारे वाहत असून आणखी दोन दिवस ही स्थिती कायम राहील. काही ठिकाणी जोरदार सरी आणि वेगवान वारे वाहण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी ठाणे, रायगडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस पडलेल्या राज्यातील दुष्काळजन्य स्थितीत महिन्याभरानंतर सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.