कार्ड घोटाळे, समाजमाध्यमांवरील अपप्रचार यांचे प्रमाण जास्त

जास्त नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक, डेबिट-क्रेडिट कार्ड घोटाळे, अश्लील फोटो किंवा मजकूर समाजमाध्यमांवरून प्रसारित करणे अशा प्रकारचे सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा विविध उपाय राबवत आहेत. मात्र यानंतरही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण जास्त असल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो-एनसीआरबी) दिला आहे. गतवर्षीच्या आकडेवारीनुसार मुंबई आणि पुणे या शहरातील सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने देशातील एकूण गुन्हेगारीविषयक अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार सायबर गुन्ह्य़ांवर नियंत्रण आणण्यात देशातील अन्य महानगरे यशस्वी ठरत असताना मुंबई, पुण्यात मात्र सायबर गुन्हेगारी गंभीर बनत चालली आहे. देशात माहिती तंत्रज्ञानातील सर्वात आघाडीचे शहर असलेल्या बंगळूरुला मागे टाकून मुंबई यंदा सायबर गुन्हेगारीत अव्वल ठरली आहे. २०१४ आणि २०१५ या वर्षांत सायबर गुन्ह्य़ांची संख्या बंगळूरुमध्ये सर्वाधिक होती. २०१५मध्ये बंगळूरुत १०४२ सायबर गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. तर मुंबईत ७७९ गुन्ह्य़ांची नोंद झाली, परंतु बंगळूरु  पोलिसांनी सायबर गुन्हेगारीवर वचक बसवल्याने २०१६मध्ये या शहरात ७६२ सायबर गुन्ह्य़ांची नोंद झाली. विशेष म्हणजे, २०१६मध्येही मुंबईत ७८० गुन्ह्य़ांची नोंद झाली. आधीच्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील सायबर गुन्ह्य़ांमध्ये एकाची वाढ झाली आहे. मात्र अन्य शहरांतील गुन्हेगारी नियंत्रणात आल्याने आपसूकच मुंबई याबाबतीत अव्वल क्रमांकावर ढकलली गेली. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञानाचे नवे शहर म्हणून विकसित असलेल्या पुण्यातील सायबर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. २०१५मध्ये ८५ सायबर गुन्ह्य़ांची नोंद असताना २०१६मध्ये हा आकडा थेट २६९वर पोहोचला आहे. सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे घडलेले गुन्हे लक्षात घेतले तर मात्र जयपूर, लखनौ, बंगळूरु, पाटणा आणि पुणे ही महानगरे मुंबईच्या पुढे आहेत. राज्यांचा विचार केल्यास सायबर गुन्ह्य़ांच्या नोंदीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात २३८० सायबर गुन्हे नोंद झाले. ‘गुन्हय़ांची नोंद जास्त झाली याचा अर्थ मुंबई किंवा महाराष्ट्रात परिस्थिती वाईट आहे,असा होत नाही. सायबर गुन्हयांची नोंद करता यावी यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सायबर पोलीस ठाणे, सायबर प्रयोग शाळा कार्यरत आहेत. गुन्हा नोंदवण्यासाठीची सुविधा आणि गुन्हा घडल्यानंतर संकोच न करता पुढे यावे यासाठीची जनजागृती प्रभावीपणे सुरू आहे. दडपादडपी न करता गुन्हा नोंदवल्यामुळे मुंबईत जास्त गुन्हे नोंद दिसतात. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत या गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी आहे.

डेबिट-क्रेडिट कार्ड घोटाळे, फसवणूक, समाजमाध्यमांवरून महिलांचा विनयभंग, पाठलाग, बँकअधिकारी असल्याचे भासवून फोनवरून डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याचे तपशील घेऊन परस्पर पैसे लांबवणे, जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण मुंबईत जास्त आहे. तर बंगळूरुमध्ये बदला घेण्याच्या भावनेतून बदनामी करण्याचे गुन्हे जास्त नोंद आहेत.