अग्निशमन दलाकडून देण्यात येणाऱ्या परवानगी प्रक्रियेत त्रुटी; उपाय राबवण्यापूर्वीच प्रमाणपत्र बहाल

लोअर परळच्या कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो’ हॉटेलमध्ये झालेल्या अग्नितांडवापाठोपाठ गुरुवारी मरोळमध्ये आणि शुक्रवारी नागपाडय़ात लागलेल्या आगीनंतर मुंबईतील इमारती व आस्थापनांच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याहूनही अधिक प्रश्न अग्निशमन दलाकडून देण्यात येणाऱ्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रांबाबत उपस्थित होत आहेत. रिक्षादेखील शिरू न शकणाऱ्या गल्लीबोळातील दुकानाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रात ‘येथे अग्निशमन दलाच्या गाडय़ा जाऊ शकतील’ असा शेरा दिला जातो. एवढेच नव्हे तर, आगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्या केवळ हमीवर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बहाल केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागले असून ठिकठिकाणी चाळींच्या जागेवर टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. मुंबईमधील गिरण्या बंद पडल्यानंतर त्यांच्या जागेमध्येही विकास करण्यात आला. मिल परिसरात अनेक मोठमोठय़ा इमारती उभ्या राहिल्या. या इमारतींमध्ये बडय़ा कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स, पब थाटण्यात आले. केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तेथे मोठय़ा प्रमाणावर सजावट करण्यात येत असून सजावटीसाठी ज्वालाग्राही वस्तूंचा सर्रास वापर करण्यात येतो.

हॉटेल सुरू करण्यासाठी पालिकेच्या परवानगीबरोबर अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची गरज असते. अग्निशमन दलांच्या विभागीय अग्निशमन केंद्रांमार्फत संबंधित जागेची पाहणी करून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले जाते. तत्पूर्वी संबंधितांना पालिकेच्या आरोग्य खात्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याने हॉटेल चालविण्यास परवानगीचे पत्र दिल्यानंतर हॉटेलचे क्षेत्रफळ नमूद केले जाते. क्षेत्रफळानुसार हॉटेलची श्रेणी निश्चित होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित हॉटेलची पाहणी केली जाते. हॉटेलमधील मुदपाकखाना (किचन) कमीत कमी १२० चौरस फूट आहे की नाही, मुदपाकखान्यातून आपत्कालीनसमयी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजा आहे की नाही, मुदपाकखान्यात पोटमाळा नाही ना, नियमानुसार आग विझविण्यासाठी एक्स्टिंविशर, वाळूने भरलेल्या बादल्या आहेत की नाही यासह अन्य विविध बाबींची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाते. नियमानुसार नसलेल्या अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता करण्यात यावी असे नमूद करून अग्निशमन दलाकडून संबंधित मालकाला हॉटेलसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले जाते. अनेकदा गल्लीबोळातील आस्थापनांपर्यंत छोटे वाहन नेण्याचीही सुविधा नसते. मात्र, त्या आस्थापनांनाही ‘अग्निशमन वाहने पोहोचू शकतात’ असा शेरा लावून प्रमाणपत्र दिले जाते.

अग्निशमन दलाकडून दिल्या जाणाऱ्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रावर नमूद बाबींची हॉटेल मालकाने पूर्तता केली आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी त्या हॉटेलकडे पुन्हा फिरकतच नाहीत. हे काम पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याचे आहे, असा दावा अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. तर वैद्यकीय आरोग्य अधिकारी अग्निशमन दलाकडे अंगुलिनिर्देश करीत आहेत. एकदा अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र पदरात पडल्यानंतर हॉटेल मालकही अग्निसुरक्षाविषयक बाबींकडे दुर्लक्ष करतात.या संदर्भात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच आपली नावेही जाहीर करू नये, अशी विनंती करण्यात आली. अजोय मेहता यांनी मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संबंधित आस्थापनाची पाहणी करून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यानंतर हात झटकता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.