कारवाईमुळे अग्निप्रतिबंधक प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांचा नकार

कमला मिल दुर्घटनेप्रकरणी अग्निशमन दलाच्या दोघा अधिकाऱ्यांना झालेली अटक, ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मार्गदर्शक पद्धतीचा अभाव आणि बांधकामांच्या तुलनेत अधिकाऱ्यांची अल्प संख्या अशी कारणे देत मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे. सुनिश्चित कार्यपद्धती अमलात येईपर्यंत अग्निप्रतिबंधक प्रमाणपत्र देण्याचे काम केले जाणार नाही, असे ‘फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशन’ने शुक्रवारी जाहीर केले.

मोजोस बिस्रो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना डिसेंबरमध्ये लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही उपाहारगृहांमध्ये अग्निप्रतिबंधासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती तसेच अनधिकृत बांधकामामुळे बाहेर पडण्याचा मार्गही अडवण्यात आला होता. मात्र तरीही अग्निशमन दलाकडून ‘वन अबव्ह’ला ना हरकत प्रमाण देण्यात आल्याचे अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालावरून उघड झाल्याने दोघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनेने या कारवाईला विरोध केला आहे. सध्या एका वॉर्डसाठी केवळ एक अग्निशमन अधिकारी असून त्यांच्यावर हजारो बांधकामांची तपासणी करण्याची जबाबदारी आहे. नेमणूक केलेल्या नामनिर्देशन अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले नसल्याने ते पात्र नाहीत. त्याचप्रमाणे ना हरकत प्रमाणपत्र देताना आरोग्य खाते, इमारती व कारखाने विभाग तसेच परवाना विभागाचा सहभाग असतो. मात्र सर्व जबाबदारी अग्निशमन अधिकाऱ्यांवर टाकलेली असते. नेमक्या कोणत्या निकषांचा विचार करून प्रमाणपत्र द्यावे याबाबत सुनिश्चित पद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) अस्तित्वात नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्र दिल्यावर कोणत्याही कारणासाठी दोषारोप होऊ शकतो, असे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले. यासंबंधी २७ फेब्रुवारी रोजी आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा झाली होती, मात्र त्यानंतरही ‘एसओपी’ तयार करण्यात आलेली नाही.

एकाच अधिकाऱ्याला अग्निप्रतिबंधक उपाययोजनांपासून आग विझवण्यापर्यंत आणि ना हरकत प्रमाणपत्रांपासून कर्मचाऱ्यांच्या नियोजनाचे काम करावे लागते. आज सर्वच अधिकारी २४ तास काम करत असून या स्थितीत केव्हाही अटक होऊ शकते या भीतीखाली काम करणे कठीण असल्याने एसओपी होईपर्यंत प्रमाणपत्र देण्याचे काम बंद ठेवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.  दलातील सर्व अधिकारी या संघटनेचे सभासद आहेत.

पूर्णवेळ प्रमुख अधिकारी नेमावा

मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी पूर्णवेळ प्रमुख अग्निशमन अधिकारी आवश्यक आहे. मात्र सध्याच्या अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र फायर सव्‍‌र्हिसेसचे संचालकपद दिल्याने ते या पदासाठी फार वेळ देऊ शकत नाहीत. २० अग्निशमन अधिकारी हे कार्यालयामध्ये लिपिकीय काम करत असून अनेक अधिकारी महाराष्ट्र फायर सव्‍‌र्हिसेसच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनकडून करण्यात आला.